Advertisement Advertisement

रस्त्यावरील गिट्टी ठरली जीवघेणी! दुचाकी घसरून ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू; रखडलेल्या महामार्गाच्या कामावर नागरिकांचा संताप…

जळगाव जामोद :(बुलडाणा कव्हरेज न्युज)रस्त्यावर साचलेल्या गिट्टीमुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात जामोद येथील ६५ वर्षीय दुर्गाबाई मुरलीधर जोशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे जळगाव जामोद–वारी हनुमान महामार्गावरील रखडलेल्या कामाबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

. जाहिरात 👆

मिळालेल्या माहितीनुसार, २५ जून रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजता दुर्गाबाई जोशी या आपल्या नातवासोबत दुचाकीने जामोदहून सोनबर्डीकडे जात होत्या. जामोद येथील आश्रम शाळेजवळ रस्त्यावर साचलेल्या गिट्टीमुळे दुचाकीचा तोल जाऊन त्या खाली पडल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर त्यांना प्रथम जळगाव जामोद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी अकोला येथील विदर्भ रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच २५ जून रोजी रात्री सुमारे ८ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्यावर २६ जून रोजी दुपारी ३ वाजता जामोद येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

दरम्यान, जळगाव जामोद–वारी हनुमान महामार्गाचे काम अनेक ठिकाणी अद्याप अपूर्ण असून रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. काही ठिकाणी गिट्टी व मुरूम टाकून काम अर्धवट सोडल्यामुळे दुचाकीस्वारांसह इतर वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

या दुर्दैवी घटनेनंतर नागरिकांनी संबंधित बांधकाम कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महामार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, धोकादायक ठिकाणी इशारा फलक लावावेत, आवश्यक सुरक्षाव्यवस्था करावी आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!