सिंदखेडराजा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गालगत सिंदखेडराजा तालुक्यातील सावरगाव माळ येथे प्रस्तावित ‘कृषी समृद्ध नवनगर’ (स्मार्ट सिटी) प्रकल्पाच्या मंजुरीच्या हालचालींना वेग आला असून, प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचताच मतदारसंघात श्रेयवादाचे राजकारण चांगलेच रंगले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे नेते व कार्यकर्ते हा प्रकल्प आपल्या नेत्याच्या पाठपुराव्यामुळेच मंजुरीच्या उंबरठ्यावर आल्याचा दावा करत सोशल मीडियावर आमनेसामने आले आहेत.
प्रकल्पाचे श्रेय मिळविण्यासाठी विधानसभेतील भाषणांचे व्हिडिओ, शासनाला दिलेली निवेदने, बैठकींचे संदर्भ आणि डिजिटल बॅनर्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यामुळे विकासाच्या प्रकल्पापेक्षा ‘क्रेडिट वॉर’चीच चर्चा अधिक रंगू लागली आहे.
विद्यमान आमदार मनोज कायंदे यांच्या समर्थकांनी विधानसभेतील हिवाळी अधिवेशनातील व्हिडिओ शेअर करत, मुख्यमंत्रीस्तरीय उपसमितीची बैठक न झाल्यामुळे प्रकल्प दोन ते तीन वर्षे रखडल्याचा मुद्दा आमदार कायंदे यांनी सभागृहात उपस्थित केल्याचे सांगितले आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ, स्थानिक तरुणांसाठी रोजगार आणि प्रकल्पाला गती मिळावी यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचा दावा करण्यात येत आहे. याशिवाय १७ मार्च २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समृद्धी महामार्गालगतच्या विविध नवनगरांबाबत विधानसभा व विधान परिषद सदस्यांनी दिलेल्या सामूहिक निवेदनामुळेही प्रक्रियेला वेग आल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे, शिवसेना (शिंदे गट)चे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या समर्थकांनीही सोशल मीडियावर मोहीम उघडली आहे. आमदार असतानापासून विविध निवेदने, बैठका आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याचे सांगत, २२ जून २०२६ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सावरगाव माळ नवनगराच्या अधिसूचनेसंदर्भात सादर केलेल्या निवेदनाचा दाखला दिला जात आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच शासन लवकरच अधिकृत अधिसूचना काढणार असल्याचा दावा शिवसेना कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष)चे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या समर्थकांनी मार्च २०२३ मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनातील व्हिडिओ समोर आणत या प्रकल्पाचा पाया डॉ. शिंगणे यांनीच रचल्याचे म्हटले आहे. समृद्धी महामार्गाच्या सुरुवातीच्या नियोजनापासून माळ सावरगाव, गोळेगाव आणि निमखेड येथील भूसंपादन, तसेच प्रशासकीय अडथळे दूर करण्यासाठी त्यांनी विधानसभेत सातत्याने प्रश्न उपस्थित केल्याची आठवण समर्थकांकडून करून दिली जात आहे.
दरम्यान, राजकीय नेत्यांमध्ये श्रेयासाठी स्पर्धा सुरू असली तरी मतदारसंघातील शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, उद्योजक आणि व्यापारी वर्गाची अपेक्षा मात्र वेगळी आहे. “प्रकल्पाचे श्रेय कोणालाही मिळो, पण सावरगाव माळ येथील कृषी समृद्ध नवनगर लवकरात लवकर प्रत्यक्षात यावे,” अशी सर्वसामान्यांची भावना आहे. हा प्रकल्प साकार झाल्यास स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, तर शेतमाल प्रक्रिया उद्योगांमुळे शेतकऱ्यांना अधिक चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
त्यामुळे श्रेयवादाचे राजकारण बाजूला ठेवून सर्व लोकप्रतिनिधींनी सामूहिक प्रयत्नांतून प्रकल्पाला गती द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत असून, मतदारसंघातील जनतेसाठी अखेरचा मुद्दा एकच आहे—”श्रेय नव्हे, तर विकास हवा!”














