मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज):तालुक्यातील वडोदा येथे ५८ वर्षीय इसमाने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना २३ जून रोजी उघडकीस आली. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडोदा येथील अरुण रामचंद्र मुंढे (वय ५८) यांनी गावशिवारातील गट क्रमांक ४४९ मधील शेतात लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. ही घटना निदर्शनास आल्यानंतर गणेश अरुण मुंढे यांनी याबाबत मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीनुसार, मृत्यूबाबत कोणावरही संशय किंवा तक्रार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार पोलिसांनी मर्ग क्रमांक १९/२०२६ अन्वये कलम १९४ बीएनएसएस अंतर्गत आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोहेकॉ रघुनाथ जाधव करीत आहेत.













