Advertisement Advertisement

‘जावई खुश होईल’ म्हणत धोंड्यात टाकली अंगठी; ऐन अंगठीचा धोंडा मांजर घेऊन पळाली, मांजर पुढं, सासू मागं…. शेवटी मांजर….

बीड (कव्हरेज ग्रुप नेटवर्क)अधिक मास अर्थात धोंड्याचा महिना सुरू झाला की सासुरवाडीला जाणाऱ्या जावयांचे चांगलेच लाड होतात. सासरच्या मंडळींकडून मानपान, आहेर आणि गोडधोड जेवणाची रेलचेल असते. मात्र बीड जिल्ह्यातील टाकरवण परिसरातील एका गावात धोंडे जेवणाच्या कार्यक्रमात असा काही प्रकार घडला की त्याची चर्चा आता संपूर्ण परिसरात रंगली आहे. जावयासाठी खास आहेर म्हणून ठेवलेली ५ ग्रॅम सोन्याची अंगठी थेट घरातील मांजरानेच गिळल्याची धक्कादायक आणि तितकीच अजब घटना समोर आली आहे.

माहितीनुसार, अधिक मासानिमित्त सासूबाईंनी आपली लेक आणि जावयाला धोंडे जेवणासाठी घरी बोलावले होते. जावयाला आनंदाचा धक्का देण्यासाठी त्यांनी ५ ग्रॅम सोन्याची अंगठी एका पिठाच्या धोंड्यात लपवून ठेवली होती. घरात पाहुणचार, गप्पा आणि जेवणाची लगबग सुरू असतानाच घरातील मांजराने तो धोंडा उचलून फस्त केला. काही क्षणातच अंगठी असलेला धोंडा मांजराच्या पोटात गेल्याचे लक्षात येताच घरात एकच गोंधळ उडाला.

घरातील मंडळींनी तातडीने मांजराला पकडून एका ठिकाणी बांधून ठेवले. जावयासाठी ठेवलेली सोन्याची अंगठी आता कशी मिळणार, असा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला. अखेर जावयाला संपूर्ण प्रकार सांगण्यात आला. अंगठी नंतर देण्याचे आश्वासन देत कपड्यांचा आहेर करून लेक-जावयाची तात्पुरती बोळवण करण्यात आली.

यानंतर घरच्यांनी चार दिवस मांजरावर बारकाईने लक्ष ठेवले. विष्ठेद्वारे अंगठी बाहेर पडेल, अशी आशा होती. मात्र अनेक दिवस वाट पाहूनही काहीच निष्पन्न झाले नाही. अखेर मांजराला पशुवैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी उपचार सुरू करत उलटी होण्यासाठी औषध दिले, परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यान मांजराचा मृत्यू झाला.

मांजर दगावल्यामुळे घरच्यांना मोठी हळहळ वाटली. मात्र मौल्यवान अंगठी मिळवणेही आवश्यक होते. त्यामुळे पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मदतीने मृत मांजराच्या पोटाची तपासणी करण्यात आली. त्यावेळी मांजराच्या पोटातून ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली. अखेर अनेक दिवसांच्या धावपळीनंतर जावयाचा आहेर त्याच्यापर्यंत पोहोचला, मात्र त्यासाठी एका निष्पाप मांजराचा जीव गेला.

या अनोख्या आणि दुर्दैवी घटनेची सध्या टाकरवण परिसरासह बीड जिल्हाभर जोरदार चर्चा सुरू असून, “जावयाची अंगठी मांजराच्या पोटात गेली” ही गोष्ट आता गावोगावी चर्चेचा विषय ठरली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!