मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) प्रेमसंबंधाच्या काळात मिळालेली छायाचित्रे आणि व्हिडीओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग वापरून युवतीचे लग्न मोडून टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय युवतीने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला. संबंधित युवतीचे लग्न खामगाव येथील एका युवकासोबत ठरल्यानंतर हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, चेतन प्रकाश सातव (रा. कोथळी, ता. मोताळा) याचे फिर्यादीसोबत पूर्वी प्रेमसंबंध होते. त्या काळात युवतीने त्याला पाठविलेली छायाचित्रे तसेच व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलदरम्यान तिच्या संमतीशिवाय करण्यात आलेले स्क्रीन रेकॉर्डिंग कुटुंबीयांना पाठवून लग्न मोडून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. याशिवाय ऋषीकेश सुरडकर (रा. कोथळी) याने फिर्यादीला फोन करून चेतन सातव याच्याशी बोलण्यासाठी दबाव टाकल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
ही घटना २९ मार्च २०२६ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात आले असून, याप्रकरणी ७ जून रोजी बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कपले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.













