Advertisement Advertisement

“देऊळगाव राजाच्या बाजार समितीत धक्कातंत्र..! “साहेबांचा एक मेसेज अन् बाजार समितीत उलटलं सगळं गणित; शंकरदादा सभापती, खरात उपसभापती!”

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची बहुप्रतिक्षित निवड प्रक्रिया अखेर मंगळवारी (२ जून) नाट्यमय घडामोडींमध्ये पार पडली. अनेक दिवसांपासून तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडीत सर्व चर्चांना पूर्णविराम देत सभापतीपदी शंकरराव रामराव शिंगणे तर उपसभापतीपदी भगवान नंदाजी खरात यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

माजी सभापती समाधान शिंगणे यांनी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पदाचा राजीनामा दिल्याने सभापतीपद रिक्त झाले होते. त्यानंतर नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

ऐनवेळी डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे ‘धक्कातंत्र’!

बाजार समितीच्या सभापतीपदासाठी सुरुवातीला लक्ष्मण महादू (एल. एम. काका) शिंगणे यांचे नाव आघाडीवर मानले जात होते. त्यानंतर माजी सरपंच भरत पहाड यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू झाली होती. अनेक संचालकही या पदासाठी इच्छुक असल्याने विविध राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले होते.

मात्र, अखेरच्या क्षणी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आपले राजकीय वजन वापरत शंकरराव शिंगणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. बैठकीदरम्यान मोबाईल संदेशाद्वारे शंकरराव शिंगणे यांच्या नावाचा प्रस्ताव पुढे आल्याने उपस्थित संचालकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले. अखेरीस सर्वांनी या नावास संमती दर्शवली.

उपसभापतीपदासाठी चुरस, भगवान खरात यांची बाजी!

सभापतीपदासाठी शंकरराव शिंगणे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली. मात्र, उपसभापती पदासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळाली.

या पदासाठी गणेश मुक्ताराम डोईफोडे आणि भगवान नंदाजी खरात यांनी अर्ज दाखल केले होते. राजकीय वर्तुळात गणेश डोईफोडे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात असतानाच ऐनवेळी राजकीय गणिते बदलली आणि भगवान खरात यांच्या नावावर एकमत झाले. त्यामुळे अखेर उपसभापतीपदाची माळ भगवान खरात यांच्या गळ्यात पडली.

नेत्यांच्या एकजुटीचा संदेश!

माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि विद्यमान आमदार मनोजभाऊ कायंदे यांनी सामंजस्याने व एकमताने दोन्ही नावांची घोषणा केली. या घोषणेनंतर उपस्थित संचालक व कार्यकर्त्यांनी दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाचा जयघोष करत ‘विजय असो’च्या घोषणा दिल्या.

अनपेक्षित निर्णयामुळे अनेक राजकीय निरीक्षकांचे अंदाज चुकले, तर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. निवड प्रक्रिया शांततापूर्ण व पारदर्शक पद्धतीने पार पडल्याचे सांगण्यात आले.

निवडणूक प्रक्रिया व उपस्थिती

निवडणूक अधिकारी एस. बी. शितोळे व नागरे शिंदे यांनी संपूर्ण निवड प्रक्रिया पार पाडली. यावेळी शरद पवार गटाचे नेते राजू शिरसाठ, तालुकाध्यक्ष राजेश इंगळे, तसेच अजित पवार गटाचे संतोष खांडेभराड, माजी नगराध्यक्ष प्रकाश गीते यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

पोलीस प्रशासनाच्या वतीने ब्रह्मगिरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पडली.

दरम्यान, नवनिर्वाचित सभापती शंकरराव शिंगणे आणि उपसभापती भगवान खरात यांच्यावर तालुक्यातील शेतकरी व व्यापाऱ्यांच्या अपेक्षांची मोठी जबाबदारी असणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!