Advertisement Advertisement

माहेरहून पैसे आणण्याचा तगादा अन् छळ; विवरातील विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): माहेरहून पैसे आणण्यासाठी सतत तगादा लावणे, शारीरिक व मानसिक छळ करणे आणि मारहाण केल्याच्या आरोपांमुळे त्रस्त झालेल्या विवरा येथील एका विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २८ मे रोजी घडली. या प्रकरणी मृत विवाहितेच्या भावाच्या तक्रारीवरून पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरीता धनराज पाटील (रा. विवरा, ता. मलकापूर) यांनी २८ मे रोजी दुपारी १२.३० वाजण्यापूर्वी गावातील एका विहिरीत उडी घेतली. त्यामध्ये त्यांचा बुडून मृत्यू झाला.

या संदर्भात मृत महिलेचा भाऊ वैभव जानकिराम पाटील (वय २२, रा. सूरवाडा, ता. बोदवड) यांनी दसरखेड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत नमूद केल्यानुसार, सरीता पाटील यांना सासरच्या मंडळींकडून माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार दबाव टाकण्यात येत होता. तसेच त्यांना शारीरिक व मानसिक त्रास देण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, सासरे अशोक शामराव पाटील, सासू इंद्रायणीबाई अशोक पाटील, दीर राजेश अशोक पाटील, पती धनराज अशोक पाटील (सर्व रा. विवरा) तसेच नणंद अक्काबाई निलेश पाटील (रा. ढालसिंगी, ता. जामनेर) यांनी विवाहितेला पैशांसाठी त्रास दिला. या छळाला कंटाळूनच सरीता यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या तक्रारीवरून दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी अप. क्र. ७०/२०२६ नुसार संबंधित पाच आरोपींविरुद्ध बीएनएसच्या कलम ८० व ८५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वारे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!