खामगाव(बुलडाणा कव्हरेज न्युज): “पोलीस फक्त कायदा-सुव्यवस्था सांभाळतात” ही पारंपरिक प्रतिमा बाजूला ठेवत खामगाव शहर पोलीस स्टेशनने सामाजिक आणि नागरी जबाबदारीचे उत्तम उदाहरण समोर ठेवले आहे. ‘आपला विभाग, आपली जबाबदारी’ या भावनेतून खामगाव पोलिसांनी नगर परिषदेचा तब्बल १५ लाख रुपयांचा थकीत कर २६ मे रोजी अदा केला.
शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी स्वतः नगराध्यक्षा सौ. अपर्णाताई सागर फुंडकर यांच्या दालनात जाऊन १५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. पोलिसांनी स्वखुशीने पुढाकार घेत थकीत कर भरल्याने शहरात या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबरच नागरी कर्तव्याचे भान ठेवत पोलिसांनी उचललेले हे पाऊल इतर शासकीय, निमशासकीय तसेच खासगी संस्थांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
यावेळी नगराध्यक्षा अपर्णाताई फुंडकर म्हणाल्या, “शहराच्या विकासासाठी आर्थिक शिस्त आणि कर भरणे अत्यंत आवश्यक आहे. खामगाव पोलिसांनी दाखवलेली जबाबदारी आणि प्रामाणिकपणा निश्चितच कौतुकास्पद आहे. प्रत्येक नागरिक आणि संस्था वेळेवर कर भरू लागली, तर शहराचा विकास अधिक वेगाने होऊ शकतो.”















