Advertisement Advertisement

शेतकऱ्यांचा रखडलेला पिकविमा तात्काळ द्या, कॅनमध्ये डिझेल द्या; शेतकरी नेते रविकांत तुपकरांची मंत्रालयात आक्रमक भूमिका..!

बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज)बुलढाणा जिल्ह्यातील हजारो नुकसानग्रस्त शेतकरी अद्यापही पिकविम्यापासून वंचित असून पेरणी तोंडावर आल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. रखडलेला पिकविमा तात्काळ मिळावा तसेच शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून द्यावे, या मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुंबईतील मंत्रालयात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांची भेट घेत आक्रमक भूमिका मांडली. यावेळी आ. मनोज कायंदे हेही उपस्थित होते.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी यापूर्वीच पिकविमा व इंधन टंचाईच्या मुद्द्यावर प्रशासनाला निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर आता थेट मंत्रालय गाठत त्यांनी मंत्र्यांसमोर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या.

तुपकर यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना सांगितले की, २०२४ मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप पिकविम्याची रक्कम मिळालेली नाही. तर २०२५ मधील नुकसानीची मदतही प्रलंबित आहे. नैसर्गिक आपत्ती, शेतीमालाला कमी भाव आणि आता डिझेल टंचाईमुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे संबंधित विमा कंपन्यांना तातडीने आदेश देऊन शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे अदा करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी कृषिमंत्री भरणे यांनी तुपकर यांची बाजू ऐकून सकारात्मक आश्वासन दिल्याची माहिती समोर आली असून जिल्ह्यातील रखडलेल्या पिकविम्याचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात सुरू असलेल्या डिझेल टंचाईबाबतही तुपकर यांनी पालकमंत्री मकरंद पाटील यांची भेट घेतली. सध्या अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची नांगरणी, पेरणी, फवारणी आणि मशागतीची कामे खोळंबली आहेत. काही ठिकाणी ट्रॅक्टरमध्ये मर्यादित डिझेल दिले जात असून कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे तुपकर यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

“शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर मालक आणि शेतकऱ्यांना आवश्यक तेवढे डिझेल मिळाले पाहिजे. पेट्रोल पंप चालकांना कॅनमध्ये डिझेल देण्याच्या स्पष्ट सूचना द्याव्यात,” अशी मागणीही त्यांनी केली.

शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही रविकांत तुपकर यांनी यावेळी दिला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!