Advertisement Advertisement

खळबळजनक..! पत्नी माहेरी गेल्याच्या रागातून बापाचे टोकाचे पाऊल; चार चिमुकल्यांना पहिले विहिरीत ढकलून दिले; नंतर स्वतःही जीवन संपवले…

जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील भाले अंजन गावात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून कौटुंबिक वादातून एका पित्याने स्वतःच्या चार निष्पाप चिमुकल्यांना विहिरीत ढकलून दिल्यानंतर स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

विजय मुसा किराडिया (वय ३५) यांच्यासह त्यांची चार मुले प्रीत विजय किराडिया (७), प्राची विजय किराडिया (५), पूर्वी विजय किराडिया (४) आणि पीयूष विजय किराडिया (२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, विजय किराडिया आणि त्यांच्या पत्नीमध्ये काल सायंकाळी कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता. या वादानंतर पत्नी जवळील इस्लामपूर येथे माहेरी निघून गेली. दरम्यान आज सकाळी विजय यांनी मुलांना चहा करून दिला. त्यानंतर ते घरातील कामे करत असल्याचे पाहून त्यांच्या वडिलांनी पत्नीबाबत विचारणा केली. यामुळे विजय संतप्त झाल्याचे सांगितले जात आहे.

यानंतर विजय यांनी चारही मुलांना घेऊन जवळील शेतातील विहिरीकडे जात दोन मुलगे व दोन मुलींना विहिरीत ढकलून दिले. त्यानंतर विहिरीलगत दोरीच्या सहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र दोरी तुटल्याने विजय हे देखील विहिरीत पडले.

काही वेळाने संबंधित शेतातील शेतकरी शेतात आल्यानंतर विहिरीजवळ मोबाईल, चपला आणि तुटलेली दोरी आढळून आल्याने संशय निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पाचही मृतदेह विहिरीतून बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी जळगाव जामोद येथे पाठविण्यात आले आहेत.

या घटनेमुळे भाले अंजन गावासह संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!