चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यात खरीप हंगामाच्या पूर्वमशागतीची कामे वेगाने सुरू असताना निर्माण झालेल्या डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शनिवार (दि. २३ मे) रोजी मेरा खुर्द येथील नायरा पेट्रोल पंपावर डिझेल संपल्याने जवळपास ५० ट्रॅक्टर चालकांना डिझेल मिळू शकले नाही. यामुळे संतप्त शेतकरी, ट्रॅक्टर चालक व मालकांनी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली मेरा चौकी येथे पुणे–नागपूर राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन केले.
आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रस्त्यावर आडवे लावून महामार्ग वाहतुकीसाठी बंद केला. तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन सुरू होते. “शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल द्या”, “पेट्रोल पंपांवरील डिझेल टंचाई तातडीने दूर करा” अशा घोषणा देत आंदोलकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.
दरम्यान, आंदोलन सुरू असतानाच चिखलीहून संभाजीनगर येथे उपचारासाठी रुग्ण घेऊन जाणारी अँबुलन्स आंदोलनस्थळी पोहोचली. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी तत्काळ ट्रॅक्टर बाजूला करून अँबुलन्सला मार्ग मोकळा करून दिला. त्यामुळे आंदोलनाच्या काळातही शेतकऱ्यांनी माणुसकीचे दर्शन घडवल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
सध्या खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू असून तालुक्यातील बहुतांश शेतकरी यांत्रिक शेतीवर अवलंबून आहेत. गावागावांत बैलांची संख्या अत्यल्प झाल्याने ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पेरणी यंत्र आदी साधनांवर शेतीची सर्व कामे सुरू आहेत. अशा परिस्थितीत ऐन हंगामाच्या तोंडावर निर्माण झालेल्या इंधन तुटवड्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
आंदोलनाची माहिती मिळताच प्रशासन व पोलीस विभाग तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तहसीलदार गावंडे, नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड तसेच अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. जिल्हाधिकारी यांच्या बैठकीसाठी चिखली येथे गेलेले ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी रास्ता रोकोची माहिती मिळताच तत्काळ आंदोलनस्थळी धाव घेतली.
प्रशासनाकडून पुढील दोन दिवसांत प्रत्येक पेट्रोल पंपावर दोन-दोन डिझेल टँकर उपलब्ध करून देण्यात येतील तसेच डिझेल पुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, “दोन दिवसांत डिझेल पुरवठा सुरळीत झाला नाही तर जिल्हाभर तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल.”
आंदोलनात गणेश थुट्टे, विनोद थुट्टे, भागवत थुट्टे, कृष्णा थुट्टे, शरद थुट्टे, विशाल थुट्टे, संदीप थुट्टे, समाधान थुट्टे, सतीश थुट्टे, अशोक थुट्टे, रामेश्वर शेळके, रामदास मुजमुले, आकाश पैठणे, दिपक गाडेकर, अंकुश देशमुख, विनोद देशमुख आदींसह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.
या आंदोलनामुळे काही काळ पुणे–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात आली.















