Advertisement Advertisement

संतचोखामेळा धरणावर अवैध रेती उपशावर धडक कारवाई; ८१ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील ग्राम सिनगाव जहागीर शिवारातील संतचोखामेळा धरण परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध रेती उपशावर देऊळगाव राजा पोलिसांनी महसूल विभागाच्या मदतीने धडक कारवाई करत तब्बल ८१ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून इतर फरार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ मे रोजी सकाळी सुमारे ६.४५ वाजताच्या सुमारास पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांना गुप्त माहितीदारामार्फत संतचोखामेळा धरण परिसरात बोटींच्या सहाय्याने शासनाचा महसूल बुडवून अवैधरित्या रेती उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने संयुक्त कारवाईची मोहीम राबविण्यात आली.

या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मोहोळकर, पोहेकॉ रामकिसन गिते, पोलीस कर्मचारी प्रवीण डोईफोडे व शिवाजी दराडे यांच्यासह नायब तहसीलदार सायली जाधव तसेच महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

संतचोखामेळा धरण परिसरात बोटीद्वारे पेट्रोलिंग करत असताना जलाशयात काही इसम रेतीचा अवैध उपसा करताना आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच काही संशयित दुसऱ्या बोटीतून पसार झाले. मात्र घटनास्थळावरून तीन मोठ्या लोखंडी बोटी, रेती वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या तीन इंजिनयुक्त लहान बोटी तसेच जोडणी साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले. या बोटींमध्ये एकूण ९ ब्रास रेती आढळून आली.

कारवाईदरम्यान शेख फिटू शेख मुस्ताक (वय ३०, रा. अनामत, ता. राजमहल, जि. साहेबगंज, राज्य झारखंड) यास ताब्यात घेण्यात आले. पंचासमक्ष करण्यात आलेल्या पंचनाम्यात ३ मोठ्या लोखंडी बोटी, ३ इंजिनयुक्त लहान बोटी, जोडणी साहित्य व ९ ब्रास रेती असा एकूण ८१ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आरोपी शेख फिटू शेख मुस्ताक व इतर फरार आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) तसेच गौण खनिज अधिनियम कलम २१(१), २१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे अधिकारी पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!