खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहर व परिसरात १७ मे रोजी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका वृद्धासह तरुणाने आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या. या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सतीफैल परिसरातील कृपालसिंग चरणसिंग मेहरा (वय ६५) यांनी जनुना तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. पत्नी जमनाबाई मेहरा यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्यानंतर ते मानसिक तणावात असल्याची माहिती समोर आली आहे. शोधाशोधीनंतर त्यांचा मृतदेह तलावात आढळून आला.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १९४ अन्वये मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
दुसऱ्या घटनेत, महादेव निवृत्ती ढोले (वय २९, रा. श्रीधर नगर, घाटपुरी) हा तरुण संत भय्युजी महाराज आश्रमाजवळील पडीत जागेत झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविला असून घटनेचा तपास सुरू आहे.














