Advertisement Advertisement

बुलढाण्यात ‘एक्का-बादशहा’ जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धडक छापा! ८ जुगारी रंगेहात जेरबंद ; ५ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर आले असून, पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व बुलढाणा शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बुलढाणा शहर पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या ‘एक्का-बादशहा’ या पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर रविवारी (१७ मे) धडक छापा टाकत पोलिसांनी ८ जुगाऱ्यांना रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम व जुगार साहित्य असा एकूण ५ लाख १२ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात अवैध धंद्यांबाबत वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अंमलदारांची आढावा बैठक घेत कठोर सूचना दिल्या होत्या. विशेषतः जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरात छुप्या पद्धतीने जुगार, मटका व इतर अवैध व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचल्या होत्या. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय यंत्रणा सक्रिय करत माहिती संकलन सुरू केले होते.

दरम्यान, बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पैशांच्या हारजीतवर ‘एक्का-बादशहा’ नावाचा जुगार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशानुसार रविवारी पोलिसांच्या पथकाने संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला. छाप्यादरम्यान काही जण पत्त्यांवर पैशांचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ८ जुगाऱ्यांना रंगेहात पकडले.

या कारवाईत आरोपींकडून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, पत्त्यांचे संच व इतर जुगार साहित्य असा एकूण ५ लाख १२ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे बुलढाणा शहरात अवैध धंदे चालवणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार दिगंबर कपाटे, वनिता शिंगणे, राकेश नायडू, अमोल शेजोळ, जयंत बोचे, अमोल अंभोरे, अजिस परसुवाले, मनोज खर्डे व शिवानंद हेलगे यांनी ही धडक कारवाई पार पाडली.

याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

मुख्यालयातच अवैध धंद्यांचा बोलबाला?

जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाखोंच्या उलाढालीचा जुगार अड्डा सुरू असल्याचे समोर आल्याने पोलीस प्रशासनासमोर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शहरात अवैध धंदे छुप्या पद्धतीने सुरू असल्याची चर्चा यापूर्वीही दबक्या आवाजात सुरू होती. मात्र, पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी घेतलेल्या कडक भूमिकेनंतरच या मोठ्या अड्ड्यावर कारवाई झाल्याने जिल्हाभरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!