Advertisement Advertisement

चिखली शहरातील राऊतवाडीत पोलिसांचा धडाकेबाज छापा; २ किलो ७८० ग्रॅम गांजा जप्त….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील राऊतवाडी परिसरात पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत एका घरावर छापा टाकून तब्बल २ किलो ७८० ग्रॅम गांजा सदृश्य पदार्थ जप्त केला. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अवैध अमली पदार्थांच्या व्यापाराला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.


शनिवारी (१७ मे) सायंकाळी सुमारे ८.३० वाजताच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. पवन चंपालाल रामावत (वय ३५, रा. राऊतवाडी, चिखली) यांच्या राहत्या घरावर अचानक छापा टाकण्यात आला. घराची सखोल झडती घेत असताना गांजा सदृश्य पुड्या आढळून आल्या. पोलिसांनी तत्काळ हा मुद्देमाल जप्त केला.


जप्त करण्यात आलेल्या गांजा सदृश्य पदार्थाचे वजन २ किलो ७८० ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत १ लाख ४० हजार रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. संपूर्ण कारवाई नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड तसेच शासकीय पंचांच्या उपस्थितीत पार पडली. पंचनामा करून मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त लिहीपर्यंत सुरू होती.


पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.


दरम्यान, गौरक्षणवाडी परिसरातही पोलिसांनी आणखी एका ठिकाणी छापा टाकून गांजा जप्त केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, याबाबतचा अधिकृत वृत्तांत पोलीस विभागाकडून अद्याप प्राप्त झालेला नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!