Advertisement Advertisement

भरधाव वॅगनारची दोन सुरक्षारक्षकांना चिरडून हत्या ! खामगावच्या नांदुरा रोडवरील भीषण अपघात; चालक वाहनासह फरार…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : भरधाव वेगातील वॅगनार कारने ड्युटीवर असलेल्या दोन सुरक्षारक्षकांना जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खामगाव शहरातील नांदुरा रोडवरील हॉटेल पुष्पांजलीसमोर घडली. शुक्रवार, १५ मे रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला.

या दुर्घटनेत गोविंद किसन शेगोकार (वय ६४) व विवेक देवीदास पायघन (वय ४१, दोघेही रा. घाटपुरी ता. खामगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही नांदुरा रोड परिसरात सुरक्षारक्षक म्हणून गार्ड ड्युटीवर कार्यरत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी वॅगनार (क्रमांक एमएच १५ जीएफ ८०७३) ही कार भरधाव वेगाने येत होती. चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत रोडच्या कडेला बसलेल्या दोन्ही सुरक्षारक्षकांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी भीषण होती की, दोघांचाही गंभीर दुखापतीमुळे जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच खामगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाल्याने पोलिसांकडून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.

या प्रकरणी राजेंद्र किसन शेगोकार (रा. तक्षशिला नगर, घाटपुरी ता. खामगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वॅगनार चालकाविरुद्ध बीएनएस कलम १०६(१), १२५ (अ)(ब), २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १३४/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि अमोल पाटे करीत आहेत.

घाटपुरी गावावर शोककळा…

अपघातात दोन सुरक्षारक्षकांचा मृत्यू झाल्याने घाटपुरी गावावर शोककळा पसरली आहे. शेगोकार व पायघन कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!