Advertisement Advertisement

चिखलीत भरदिवसा दागिन्यांची चोरी ; संशयित महिला सीसीटीव्हीत कैद….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : चिखली शहर व बसस्थानक परिसरातील सार्वजनिक सुरक्षेसाठी बसविण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याने शहरातील चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच ११ मे रोजी शहरातील गजबजलेल्या परिसरात एका महिलेने दागिन्यांची थैली लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून संबंधित महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यामुळे शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मकरध्वज खंडाळा येथील शिवाजीराव ठेंग महाराज हे आपल्या मुलीसह हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याजवळील दिघेकर ज्वेलर्स येथे सोने-चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी आले होते. त्यांनी सुमारे ६० हजार रुपयांचे दागिने खरेदी केले.

दरम्यान, एक संशयित महिला दुकानाच्या प्रवेशद्वाराजवळ उभी राहून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत असल्याचे दिसून आले. शिवाजीराव ठेंग महाराज यांनी तिला बाजूला होण्यास सांगितले असता, “मलाही दुकानात यायचे आहे,” असे सांगत ती त्यांच्याशी संवाद साधत होती.

यानंतर शिवाजीराव ठेंग महाराज व त्यांची मुलगी शेजारील मनीषा स्टील होम या दुकानात घरगुती साहित्य खरेदीसाठी गेले. खरेदी करून बाहेर पडताच मुलीच्या पिशवीतील दागिन्यांची थैली गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ दुकानात शोधाशोध केली; मात्र थैली सापडली नाही. त्यानंतर त्यांनी पुन्हा दिघेकर ज्वेलर्स येथे जाऊन चौकशी केली, परंतु तेथेही दागिन्यांची पिशवी मिळून आली नाही.

शेवटी मनीषा स्टील होम येथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता, दिघेकर ज्वेलर्समध्ये संशयास्पद हालचाली करणारी तीच महिला मुलगी खरेदीमध्ये व्यस्त असताना तिच्या पिशवीतून दागिन्यांची थैली काढताना स्पष्टपणे दिसून आली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

याप्रकरणी संबंधितांनी पोलिसांशी संपर्क साधला असून पोलिसांनी तोंडी माहिती घेत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित महिलेचा शोध सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!