Advertisement Advertisement

दूध घेऊन निघालेल्या मायलेकीवर काळाचा डल्ला; भानापूरजवळ माय जागीच ठार! समोरासमोर धडक अन् मागून क्रेनची जोरदार टक्कर; दोन दुचाकीस्वार गंभीर….

सुलतानपूर(बुलढाणा कव्हरेज न्युज) : छत्रपती संभाजीनगर-नागपूर महामार्गावर भानापूर परिसरात सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास झालेल्या भीषण तिहेरी अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून काही काळ महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, हिवरा खंड येथील तसलीम रमजान परसुवाले (वय ३५) हे आपल्या आई बानुबाई रमजान परसुवाले (वय ५५) यांच्यासह दुचाकी क्रमांक एमएच २८ बीएम ४९० वरून दूध व्यवसायासाठी सुलतानपूरकडे येत होते. त्याचवेळी सुलतानपूरकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने वडगाव तेजन येथील लक्ष्मण दामोदर मानवतकर (वय ३४) हे दुचाकी क्रमांक एमएच २८ सीजी १३५० ने जात होते.

भानापूर परिसरात दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत बानुबाई परसुवाले रस्त्यावर फेकल्या गेल्या. त्याचवेळी मागून येणारी क्रेन क्रमांक एमएच २८ एझेड ९१४४ ची धडक बसल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की घटनास्थळी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

या अपघातात तसलीम परसुवाले व लक्ष्मण मानवतकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने मेहकर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृत बानुबाई परसुवाले यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करून मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!