Advertisement Advertisement

जिल्ह्यात ‘बेपत्ता’ सत्राचा हाहाकार; लग्नात आलेली पाहुणीही रात्रीतून गायब….. तर दुसरी मैत्रिणीच्या लग्नाला जाते म्हणाली, पण…… जिल्हात २४ तासांत १० जण बेपत्ता…

बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): एकीकडे उन्हाळ्याचा कडाका वाढत असताना, दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस दलाची झोप उडाली आहे. गेल्या २४ ते ४८ तासांत जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत तब्बल १० तरुण-तरुणी व महिलांच्या बेपत्ता होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. प्रेमप्रकरण, कौटुंबिक वाद आणि सोशल मीडियाचा प्रभाव यामागे कारणीभूत असल्याची शक्यता व्यक्त होत असून, या घटनांमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

मेहंदीचा रंग सुकण्याआधीच नवरी गायब !

चिखली शहरातील गांधीनगर परिसरातील २४ वर्षीय रोमा गोलानी हिचे १३ मे रोजी लग्न होणार होते. १० मेच्या रात्री मोठ्या उत्साहात मेहंदीचा कार्यक्रमही पार पडला. मात्र ११ मेच्या पहाटेच रोमा अचानक घरातून गायब झाली. कुटुंबीयांनी शोध घेतला असता तिचा मोबाईल फोन बंद आढळून आला.

दरम्यान, रोमा ही गांधीनगरमधीलच सागर चव्हाण नावाच्या तरुणासोबत संपर्कात असल्याची माहिती समोर आली असून, ती त्याच्यासोबत पसार झाली असावी, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. लग्नाच्या दोन दिवस आधी नवरीच बेपत्ता झाल्याने चिखली शहरात या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.

खामगावात दोन तरुणी बेपत्ता

खामगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतून दोन तरुणी बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. मेहबूबनगर येथील १९ वर्षीय अल्फीया बी शेख अयास ही ८ मेच्या रात्री घरातून निघून गेली. ती गुलाबी व काळ्या रंगाचा बुरखा परिधान केलेली होती.

तर दुसऱ्या घटनेत, सुटाळा येथील माजी सैनिकाची २२ वर्षीय मुलगी श्रेया प्रदीप इंगळे ही ११ मेच्या पहाटे कोणालाही न सांगता घरातून निघून गेली असून, तिचा अद्याप शोध लागलेला नाही.

मलकापूर, जळगाव जामोद परिसरातही खळबळ

मलकापूर शहरातील संत कवरराम नगर येथील २६ वर्षीय कपिल तलरेजा हा “बाहेरगावी फिरायला जातो,” असे सांगून घरातून निघून गेला. मात्र तो अद्याप परतलेला नाही.

जळगाव जामोद तालुक्यातील गाडेगाव येथील २० वर्षीय वैष्णवी वरणकर ही “आधार कार्डची पावती आणते,” असे सांगून घराबाहेर पडली, पण ती पुन्हा घरी परतलीच नाही. तर पिंपळगाव काळे येथील १९ वर्षीय गायत्री नेमाडे ही तरुणी रात्री झोपेतून अचानक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.

लग्नात आलेली पाहुणीही रात्रीतून गायब

बिबी पोलीस स्टेशन हद्दीतील शेंबा येथील १९ वर्षीय विवाहिता शांता पवन चंगळ ही लग्नसमारंभासाठी पाहुणी म्हणून आली होती. मात्र रात्रीतून ती अचानक गायब झाली. तिच्या हातावर “पवन” आणि “रविण” अशी नावे गोंदलेली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मैत्रिणीच्या लग्नाला जाते म्हणाली, पण…

धामणगाव बढे परिसरातील कोऱ्हाळा बाजार येथील १८ वर्षीय रेणुका धायडे ही “मैत्रिणीच्या लग्नाला जाते,” असे सांगून घरातून निघाली. मात्र त्यानंतर ती परतलीच नाही.

तसेच बिबी पोलीस स्टेशन हद्दीतील भुमराळा येथील ३० वर्षीय विवाहिता रेणुका पिसाळ ही १० मे रोजी दुपारी कोणालाही न सांगता घरातून निघून गेली असून, तिचाही अद्याप शोध लागलेला नाही.

अल्पवयीन मुलीचे अपहरण ?

अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत मेरा बुद्रुक येथील १७ वर्षीय मनीषा गायकवाड हिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार तिच्या आईने पोलिसांत दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२) नुसार गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.

पोलिसांचे आवाहन

एकाच जिल्ह्यात आणि एकाच कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणी बेपत्ता होण्याच्या घटनांनी नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. अनेक प्रकरणांमध्ये प्रेमसंबंध, सोशल मीडियावरील ओळखी आणि कौटुंबिक तणाव यामागील कारणे असू शकतात, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

दरम्यान, या सर्व बेपत्ता व्यक्तींबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास संबंधित पोलीस स्टेशन किंवा जिल्हा नियंत्रण कक्षाशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!