चिखली तालुक्यातील पाटोदा येथे शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त गावात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यानंतर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने टाळ, मृदुंगाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात ही मिरवणूक पार पडली. “जय महाराणा प्रताप”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. मिरवणुकीत गावातील युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचाही उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
या मिरवणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे महिला व बालगोपालांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत फुगडी खेळत आणि भक्तिगीते गात मिरवणुकीत रंगत आणली. लहान मुलांनीही उत्साहाने सहभाग घेत वातावरण आनंदमय केले.
कार्यक्रमाच्या माध्यमातून शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या शौर्य, त्याग आणि राष्ट्रप्रेमाच्या विचारांना उजाळा देण्यात आला. गावकऱ्यांनी एकोप्याने आणि उत्साहात हा जयंती उत्सव साजरा करत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविले.
















