सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील भुयारी गटार योजनेच्या कामादरम्यान एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २६ एप्रिल २०२६ रोजी उघडकीस आली. आलापुरकडे जाणाऱ्या रस्त्यावर, स्व. प्रभाकरदादा ठाकरे यांच्या शेताजवळ सुरू असलेल्या कामात ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, भुयारी गटार योजनेअंतर्गत चेंबरमध्ये काम सुरू असताना मध्यप्रदेश येथील रहिवासी असलेले कामगार खुमान हे चेंबरमध्ये उतरले होते. यावेळी अचानक गुदमरल्याने त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. सहकाऱ्यांनी तत्काळ त्यांना सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भुयारी गटार योजनेचे काम अनेक वर्षांपासून सुरू असून अद्याप पूर्ण झालेले नाही. दरम्यान, अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी नगरपालिका प्रशासन व संबंधित ठेकेदारांनी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
कामगारांच्या जीविताशी खेळ होऊ नये यासाठी योग्य सुरक्षा साधने, प्रशिक्षण व देखरेख अनिवार्य करावी, तसेच प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणीही जनतेतून व्यक्त होत आहे.










