Advertisement Advertisement

भेंडवळ भविष्यवाणी 2026 जाहीर! 370 वर्षांची परंपरा कायम, भेडवळच्या घटमांडणीच्या काय काय भाकीत वर्तवले….

भेंडवळ (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे दरवर्षी अक्षय तृतीयेच्या निमित्ताने केली जाणारी प्रसिद्ध घटमांडणी यंदाही पार पडली असून वर्ष 2026 साठीची भविष्यवाणी जाहीर करण्यात आली आहे. सुमारे 370 वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेमुळे भेंडवळचे नाव राज्यभर चर्चेत असते. यंदाही अक्षय तृतीयेच्या दिवशी सूर्यास्तावेळी पारंपरिक पद्धतीने घटमांडणी करण्यात आली. त्यानंतर पहाटे सूर्योदयाच्या वेळी घटातील नैसर्गिक बदलांचे निरीक्षण करून वर्षभरातील पाऊस, पीकस्थिती, राजकीय घडामोडी, अर्थव्यवस्था आणि देशाच्या संरक्षण व्यवस्थेबाबत अंदाज जाहीर करण्यात आले.

या सोहळ्यासाठी विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य प्रदेशातून मोठ्या संख्येने शेतकरी, व्यापारी, बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. अनेक शेतकरी एक दिवस आधीच भेंडवळमध्ये मुक्काम करून सकाळच्या भविष्यवाणीची प्रतीक्षा करत होते. ग्रामीण भागात आजही या घटमांडणीबाबत मोठा विश्वास आणि उत्सुकता असल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

यंदाच्या अंदाजानुसार पिकांवर रोगराईचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे निवड, फवारणी, खत व्यवस्थापन आणि रोगनियंत्रण यावर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. मात्र कापूस, तांदूळ, तीळ आणि बाजरी या पिकांचे उत्पादन चांगले राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला. तर ज्वारी, तूर, मूग, उडीद, मटकी, जवस आणि वाटाणा ही पिके सर्वसाधारण राहतील, असे सांगण्यात आले. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत संतुलन ठेवण्याची गरज असल्याचे जाणकारांचे मत आहे.

पावसाबाबत व्यक्त केलेला अंदाज शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मानला जातो. त्यानुसार जून महिन्यात समाधानकारक व भरपूर पाऊस, जुलैमध्ये सर्वसाधारण पर्जन्य, तर ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय काही भागात अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान होण्याचाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे खरीप हंगामात पेरणीचे नियोजन, जलसंधारण आणि निचरा व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

देशाच्या एकूण परिस्थितीबाबतही संकेत देण्यात आले. देशाची संरक्षण व्यवस्था तणावपूर्ण राहू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. तसेच राजा कायम राहील, असे सांगण्यात आले असून येथे ‘राजा’ हा शब्द सत्ताधारी नेतृत्वासाठी प्रतीकात्मक वापरला जातो. त्याचबरोबर देशाची आर्थिक स्थिती फार मजबूत राहणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.

काय आहे भेंडवळची घटमांडणी?

भेंडवळची घटमांडणी ही शेतीप्रधान लोकपरंपरा असून पर्जन्यमान, पीकस्थिती, शेतीमालाचे दर, सामाजिक व राजकीय स्थिती याबाबत अंदाज व्यक्त करण्याची जुनी पद्धत आहे. सुमारे 350 ते 370 वर्षांपूर्वी महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही परंपरा सुरू केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर त्यांच्या वंशजांकडून आजही ही परंपरा जपली जात आहे.

घटमांडणी कशी केली जाते?

शेतातील मध्यभागी खड्डा करून त्यामध्ये मातीचा घट ठेवला जातो. घटात चार मातीची ढेकळे ठेवली जातात. त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवून घागरीवर पापड, भजी, वडा, सांडोई, कुरडई अशा वस्तू ठेवतात. घटाभोवती गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, बाजरी, तांदूळ, वाटाणा, मसूर आदी १८ प्रकारची धान्ये मांडली जातात.

अंदाज कशावरून व्यक्त होतो?

रात्रभर घटामध्ये नैसर्गिकरीत्या झालेले बदल पहाटे सूक्ष्मपणे पाहिले जातात. मातीच्या ढेकळांवरून चार महिन्यांच्या पावसाचा अंदाज, धान्यांवरून पिकांची स्थिती, पान-सुपारीवरून राजकीय बदल, मसुरीवरून परकीय संकट, तर इतर घटकांवरून आर्थिक व सामाजिक स्थितीचे संकेत दिले जातात.

शास्त्रीय आधार नसला तरी विश्वास कायम…

या भविष्यवाणीला कोणताही अधिकृत शास्त्रीय आधार नसल्याचे सांगितले जाते. तरीही अनेकदा काही अंदाज खरे ठरल्याचा दावा केला जातो. त्यामुळे शेतकरी आजही भेंडवळच्या भविष्यवाणीला महत्त्व देतात. बदलत्या हवामानाच्या काळात ही परंपरा ग्रामीण भागासाठी आशेचा किरण ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!