खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): माहेराहून पैसे आणण्यासाठी सतत दबाव टाकणे, चारित्र्यावर संशय घेऊन मानसिक व शारीरिक छळ करणे, शिवीगाळ, मारहाण करून अखेरीस मुलांसह घराबाहेर काढल्याप्रकरणी पतीसह सहाजणांविरुद्ध पिंपळगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोताळा तालुक्यातील गिरोली येथील जया शांताराम जाधव (वय ३६) यांनी याप्रकरणी तक्रार दिली. तक्रारीनुसार, १० मे २०११ ते १ जानेवारी २०२६ या कालावधीत पती व सासरच्या मंडळींनी संगनमताने त्यांचा सातत्याने शारीरिक व मानसिक छळ केला.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, माहेराहून पैसे आणण्यासाठी वारंवार दबाव टाकण्यात येत होता. तसेच, “तू दिसायला चांगली नाहीस” असे म्हणत अपमान केला जात होता. चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ, मारहाण तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
याशिवाय, सततच्या छळानंतर पीडित महिलेला तिच्या मुलांसह घराबाहेर काढण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पीडितेच्या फिर्यादीवरून पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात पतीसह सहाजणांविरुद्ध संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.













