Advertisement Advertisement

फेसबुक फ्रेंड रिक्वेस्टपासून ‘हनी ट्रॅप’पर्यंत! सिंदखेडराजा तालुक्यातील तरुणीसह ६ जण अटकेत…

सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): सोशल मीडियावर मैत्रीची रिक्वेस्ट पाठवून तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणे, शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्याचे फोटो-व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करत लाखो रुपये उकळणे, अशा ‘हनी ट्रॅप’ रॅकेटचा जालना पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी सिंदखेडराजा तालुक्यातील पांगरी उगले येथील रहिवासी सपना निकाळजे हिच्यासह तिच्या आणखी पाच साथीदारांना अटक करण्यात आली आहे. चंदनझीरा पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सपना निकाळजे सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असे. त्यानंतर मैत्री वाढवत प्रेमाचे नाते असल्याचा विश्वास निर्माण केला जात असे. पुढे स्वतःहून शारीरिक संबंधांसाठी तयार असल्याचे भासवून संबंधित व्यक्तीला जाळ्यात ओढले जात असे. त्यानंतर फोटो, व्हिडिओ किंवा इतर माध्यमांचा आधार घेत ब्लॅकमेल करून मोठ्या प्रमाणात पैशांची उकळपट्टी केली जात होती.

शिक्षक, इंजिनिअर आणि नोकरदार होते लक्ष्य

सपना निकाळजे ही केवळ नववीपर्यंत शिक्षण घेतलेली असली तरी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून ती उच्चशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींना लक्ष्य करत होती. तिचे माहेर सिंदखेडराजा तालुक्यातील माळ सावरगाव येथे असून तिला एक मुलगी आहे. गेल्या सहा वर्षांपासून ती माहेर आणि सासरपासून वेगळी राहत असल्याची माहिती समोर आली आहे.

या गुन्ह्यांसाठी तिने स्वतंत्र टोळी तयार केली होती. प्रत्येक साथीदाराला १० ते २० हजार रुपये मानधन दिले जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

यापूर्वीही आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड परिसरातील एका उच्चशिक्षित व्यक्तीला तिने अशाच प्रकारे जाळ्यात अडकवून लाखो रुपयांची उकळपट्टी केल्याचा आरोप आहे. सततच्या त्रासाला आणि बदनामीच्या भीतीला कंटाळून संबंधित व्यक्तीने आत्महत्या केली होती. त्या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सपना निकाळजे हिला अटक झाली होती. सुमारे सहा महिन्यांपूर्वी ती कारागृहातून बाहेर आल्यानंतर पुन्हा अशाच प्रकारचे गुन्हे सुरू केल्याचा आरोप आहे.

एका तक्रारीच्या आधारे चंदनझीरा पोलिसांनी कारवाई करत सपना निकाळजे आणि तिच्या पाच साथीदारांना अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!