मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): मलकापूर तालुक्यातील उमाळी-वरखेड मार्गावर शुक्रवारी (दि. १८) सकाळी मलकापूर आगाराची एसटी बस रस्त्यालगतच्या खड्ड्यात घसरल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित असून बसचे मात्र नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लासुरा येथून मलकापूरकडे जाणारी मलकापूर आगाराची एमएच ४० एन ९७७२ क्रमांकाची सकाळी सुमारे ९ वाजताची एसटी बस उमाळी गावापासून हाकेच्या अंतरावर असताना चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यालगतच्या खड्ड्यात घसरली.
शनिवारचा बाजार असल्याने या बसमध्ये बाजारासाठी जाणारे काही प्रवासी होते. मात्र सध्या शेतीच्या कामांची लगबग सुरू असल्याने बसमध्ये नेहमीपेक्षा कमी प्रवासी असल्याचे सांगण्यात आले. अपघातानंतर काही काळ परिसरात धावपळ उडाली, मात्र सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
या अपघातात बसचे किरकोळ नुकसान झाले असून घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नसून याबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे.














