Advertisement Advertisement

कोराडी धरणावर लवकरच सी-प्लेनची लँडिंग!विवेकानंद स्मारकाला मिळणार जागतिक ओळख…

हिवरा आश्रम(बुलडाणा कव्हरेज न्युज)जिल्ह्यातील कोराडी धरण परिसर लवकरच पर्यटनाच्या नकाशावर नवी झेप घेणार असून, येथे सी-प्लेन सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने शासनाने हालचाली वेगात केल्या आहेत. या प्रकल्पासाठी तांत्रिक सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू झाली असून, ६ एप्रिल रोजी एअरपोर्ट ॲथॉरिटीच्या नियुक्त तज्ज्ञांची टीम कोराडी धरणावर दाखल झाली.

विवेकानंद आश्रमाच्या पुढाकारातून उभारण्यात आलेले विवेकानंद स्मारक आधीच राज्यातील एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र ठरले आहे. स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित हे स्मारक दरवर्षी हजारो पर्यटकांना आकर्षित करत असते. आता सी-प्लेन सेवेमुळे या ठिकाणाला राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळण्याची शक्यता आहे.

या सर्वेक्षणात सी-प्लेन उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक बाबींची काटेकोर तपासणी केली जात आहे. यामध्ये पाण्याची लांबी (१००० ते १५०० मीटर), रुंदी (१५० ते २०० मीटर) आणि खोली (१.५ ते ३ मीटर) यांचे अचूक मोजमाप करण्यात येणार आहे. तसेच वाऱ्याचा वेग, पाण्यावरील लहरी, धुके आणि दृश्यमानता या घटकांचाही सखोल अभ्यास होणार आहे.

परिसरातील झाडे, टेकड्या आणि वीजवाहिन्यांचा आढावा घेत आकाशमार्ग अडथळामुक्त आहे का, याची खातरजमा केली जात आहे. यासोबतच जलचर, पक्षी आणि पाण्याची गुणवत्ता यांचा विचार करून पर्यावरणपूरक व शाश्वत विकासाचा दृष्टिकोन ठेवण्यात येणार आहे.

सी-प्लेन ही अशी आधुनिक सेवा आहे जी विमानासारखी उड्डाण घेते आणि पाण्यावर उतरते. त्यामुळे स्वतंत्र विमानतळाची आवश्यकता नसून, कमी प्रवासी क्षमतेच्या या विमानातून पर्यटकांना थेट विवेकानंद स्मारकापर्यंत पोहोचता येणार आहे.

या प्रकल्पामुळे विवेकानंदांच्या विचारांचा जागतिक प्रचार-प्रसार होण्यास मोठी चालना मिळेल, असा विश्वास विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी व्यक्त केला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!