बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज)महाराष्ट्र शासनाने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा लावत बुलढाणा जिल्ह्यात मोठा प्रशासकीय बदल केला आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी प्रवीणकुमार देवरे यांची नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
काल जाहीर झालेल्या बदल्यांनंतर आज पुन्हा २५ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात बुलढाण्याचा समावेश असल्याने जिल्ह्यात प्रशासकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
डॉ. किरण पाटील हे सप्टेंबर २०२३ पासून जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात विविध लोकाभिमुख उपक्रम राबवण्यात आले. तसेच लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिकांच्या निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली सुरळीत पार पडल्या.
जवळपास तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर शासनाने नियमानुसार त्यांची बदली केली आहे.
दरम्यान, पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्त असलेले प्रवीणकुमार देवरे (IAS 2013 बॅच) यांची बुलढाणा जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
देवरे यांना बुलढाणा नवीन नाही!
ते यापूर्वी बुलढाण्यात निवासी उपजिल्हाधिकारी (RDC) म्हणून कार्यरत होते. २००६ ते २००८ या कालावधीत त्यांनी जिल्ह्यात काम करताना प्रशासनासोबत सामाजिक क्षेत्रातही सक्रिय सहभाग नोंदवला होता.












