खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज)खामगाव तालुक्यातील गारडगाव येथे भ्रष्टाचाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून ग्रामसेवकाला लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
गारडगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विजय माधव गवई यांनी तक्रारदार शेतकऱ्याच्या गावाबाहेरील गावठाण जमिनीची नमुना ८-अ नोंद रद्द करून दुरुस्ती अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी तब्बल ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर एसीबीने २५ मार्च रोजी पडताळणी केली असता गवई यांनी २० हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. पुढे तडजोडीअंती १० हजार रुपये घेण्याचे ठरले.
दरम्यान, गुरुवार २ एप्रिल रोजी पंचायत समिती कार्यालय, खामगाव येथे १० हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना एसीबीच्या पथकाने विजय गवई यांना रंगेहात पकडले.
या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अमरावती एसीबीचे पोलिस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलिस अधीक्षक सचिंद्र शिंदे, बुलढाणा एसीबीचे उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास गुसिंगे व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.













