पाडळी शिंदे (बुलडाणा कव्हरेज न्युज) मेंडगाव धरणावरून अवैधरित्या विद्युत मोटार पंपाद्वारे शेतीसाठी पाणी उपसा केला जात असल्याने परिसरातील पाच गावांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या संदर्भात ‘बुलडाणा कव्हरेज’मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्ताची दखल घेत चिखली लघु पाटबंधारे विभागाने तात्काळ कारवाई करत संबंधित शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे संबंधित गावांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
मेंडगाव धरणातून मेरा, मनुबाई, मेंडगाव, बायगाव बुद्रुक आदी पाच गावांसाठी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे. मात्र सध्या धरणात केवळ १३ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने परिस्थिती चिंताजनक बनली होती. या पार्श्वभूमीवर शेतीसाठी अवैधरीत्या पाणी उपसा करणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याबाबत ११ मार्च रोजी अंबेरा येथील कनिष्ठ अभियंत्यांनी पत्र दिले होते.
दरम्यान, बायगाव बुद्रुक येथील काही शेतकऱ्यांनी शेतातील पिकांचा प्रश्न मांडत वीजपुरवठा खंडित करू नये, अशी मागणी केली होती. त्यामुळे २७ मार्च रोजी पुन्हा वीजजोडणीसाठी पत्र देण्यात आले होते. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला होता आणि संबंधित ग्रामपंचायतींची डोकेदुखी वाढली होती.
या पार्श्वभूमीवर ३० मार्च रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत चिखली लघु पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता आकाश शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. यावेळी पाटबंधारे विभाग व महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत मनुबाई, वायगाव बुद्रुक, खडका परिसरातील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला.
या कारवाईमुळे धरणावर अवलंबून असलेल्या पाचही गावांना तात्पुरता दिलासा मिळाला असून पाणीटंचाईचा उद्रेक टळला आहे. दरम्यान, मेंडगाव ग्रामपंचायतीच्या प्रशासक सरपंच विद्या कायंदे यांनी नागरिकांच्या पाणी प्रश्नाला प्राधान्य देत केलेल्या कारवाईबद्दल ‘बुलडाणा कव्हरेज’चे आभार मानले आहेत.














