शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, लाल बाबा देवी मंदिर परिसरात एका २३ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका माथेफिरू युवकाविरोधात शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोट रोड परिसरातील कालवड येथे वास्तव्यास असलेल्या पीडित महिलेची दीड वर्षांपूर्वी विशाल (रा. सावळी, ता. संग्रामपूर) याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने तिचा मोबाईल क्रमांक मिळवून सतत संपर्क साधण्यास सुरुवात केली होती. तसेच काही फोटोही त्याने आपल्या मोबाईलमध्ये साठवून ठेवले होते. दरम्यान, आरोपी दारूच्या आहारी गेल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने त्याच्याशी सर्व संबंध तोडले होते.
मंदिरातच गाठून विनयभंग; लग्नासाठी दबाव
पीडिता सध्या आपल्या आईसह अकोट रोड परिसरात भाड्याने राहत असून, १७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजताच्या सुमारास त्या लाल बाबा देवी मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. यावेळी आरोपी विशाल हा तेथे येऊन “तू माझ्याशी का बोलत नाहीस?” असा जाब विचारत भररस्त्यात अश्लील शिवीगाळ करू लागला.
इतक्यावर न थांबता त्याने पीडितेचा हात पकडून जबरदस्तीने मिठीत ओढत विनयभंग केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पीडितेने आरडाओरडा केला असता आरोपीने तिला सोडले. त्यानंतर “माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुझे लग्न दुसरीकडे होऊ देणार नाही,” अशी धमकीही दिली.
सतत पाठलाग करून मानसिक छळ…
तक्रारीनुसार, आरोपी मागील काही दिवसांपासून पीडितेचा सतत पाठलाग करत होता व तिला मानसिक त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून व स्वतःच्या जीवाला धोका असल्याची भीती वाटू लागल्याने पीडितेने शेवटी पोलिसांत धाव घेतली.
यावरून शेगाव शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५, ७८ व ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार रामदास घटे करीत आहेत.
पोलीस आरोपीच्या शोधात…
दरम्यान, या घटनेमुळे शहरात महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनीही आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी शोधमोहीम तीव्र केली आहे.













