खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला समोरून भरधाव वेगात आलेल्या मारुती स्विफ्ट डिझायर कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू झाला. मात्र, अपघातानंतर कारची तपासणी केली असता तब्बल १३ लाख ३३ हजार ५०० रुपये किमतीचा गांजा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना ३१ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास टेंभूर्णा बायपास उड्डाणपुलावर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, जी.जे. ०६ बी.वाय. १८०४ क्रमांकाचा कंटेनर नागपूरच्या दिशेने जात होता. याचवेळी समोरून येणारी एम.एच. ३० ए.एफ. ८३८५ क्रमांकाची मारुती स्विफ्ट डिझायर कार कंटेनरवर जोरात आदळली. धडक इतकी भीषण होती की, दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात कारचालक सतीष सखाराम जाधव (वय ५३, रा. माडाखळी, ता. जि. परभणी) आणि सय्यद फिरोज सै. महेबुब (वय ४६, रा. हिंगोली) हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर पोलिसांनी कारची तपासणी केली असता आतमध्ये २६ किलो ६७० ग्रॅम गांजा आढळून आला. या गांजाची किंमत तब्बल १३ लाख ३३ हजार ५०० रुपये असल्याचे समोर आले. त्यामुळे अपघाताच्या घटनेला वेगळेच वळण मिळाले. भरधाव कारच्या अपघातानंतर लाखोंचा गांजा सापडल्याने पोलिसही सतर्क झाले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
याप्रकरणी कंटेनर चालक साबीर अली इतजार अली (वय २४, रा. रुकुनपुरधामोदर, ता. जि. सुलतानपूर, उत्तर प्रदेश) यांच्या तक्रारीवरून मृत कारचालक सतीष सखाराम जाधव याच्याविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), २८१, ३२४(४), ३२४(५) तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तर कारमध्ये गांजा आढळल्याप्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात आणि गांजा प्रकरणाचा पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.













