Advertisement Advertisement

तीन एकर शेती, डोक्यावर चार लाखांचं कर्ज अन् घरची हलाखी! नापिकीच्या संकटात पेहरे कुटुंबाचा २५ वर्षांचा आधार हरपला! अमोन्यात ऋतिकच्या दुर्दैवी मृत्यूने गाव सुन्न…..

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) :सततची नापिकी, शेतीवरील कर्जाचा वाढता बोजा आणि कुटुंबाची हलाखीची आर्थिक परिस्थिती यामुळे अमोना (ता. चिखली) येथील २५ वर्षीय तरुण ऋतिक बळीराम पेहरे याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे पेहरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.

अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अमोना येथील बळीराम पेहरे यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते मिश्रीचे काम करतात. त्यांच्याकडे अमोना शिवारातील गट क्रमांक १५ मध्ये तीन एकर कोरडवाहू शेती आहे. या शेतीसाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून एक लाख रुपयांचे पीककर्ज, तर श्रीराम नागरी पतसंस्थेकडून तीन लाख रुपयांचे कर्ज घेतल्याची माहिती आहे.

दरम्यान, रोजगार हमी योजनेअंतर्गत त्यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम करण्यात आले होते. मात्र, या कामाचे पैसे अद्याप मिळाले नसल्याने कुटुंबाची आर्थिक कोंडी अधिकच वाढली होती. शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसताना कर्जाची परतफेड कशी करायची, असा प्रश्न कुटुंबासमोर उभा होता.

२ नोव्हेंबर रोजी सकाळी ऋतिक नेहमीप्रमाणे बकऱ्यांना चारा-पाणी करण्यासाठी शेतात गेला होता. बराच वेळ होऊनही तो घरी परतला नाही. त्यामुळे त्याची आई रुख्मिनाबाई पेहरे या त्याला पाहण्यासाठी शेतात गेल्या. त्यावेळी ऋतिकचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हा प्रकार समोर येताच त्यांनी आरडाओरड केली. आवाज ऐकून गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अंढेरा पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी घटनास्थळी भेट दिली. बिट जमादार किशोर जाधव यांनी पंचांसमक्ष घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी अंढेरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

घरातील तरुण व्यक्तीच्या जाण्याने पेहरे कुटुंबाचा मोठा आधार हरपला आहे. शेतीतील संकटे, कर्जबाजारीपणा आणि आर्थिक विवंचनेच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेने अमोना गावावर शोककळा पसरली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!