साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज): येथील शशिकला रामकृष्ण सुरळकर (वय ८०) यांचे बुधवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी (१२ मार्च) दुपारी १ वाजता रोकडोबा हनुमान मंदिरामागील हिंदू स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. या घटनेनंतर काही तासांतच त्यांच्या धाकट्या भावाचेही हृदयविकाराने निधन झाल्याने सुरळकर व ढोबळे कुटुंबावर दुहेरी दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शशिकला सुरळकर यांच्या निधनानंतर गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी नातेवाईक, गावातील नागरिक व कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. यवतमाळ येथील रहिवासी आणि शशिकला सुरळकर यांचे धाकटे बंधू राम नामदेव ढोबळे हेही बहिणीच्या अंत्यसंस्कारासाठी साखरखेर्डा येथे आले होते.
अंत्यसंस्कार आटोपल्यानंतर सर्व मंडळी घरी परतली असताना राम ढोबळे यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने उपचारासाठी डॉ. मगर यांच्याकडे नेण्यात आले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
बहिणीच्या निधनानंतर काही तासांतच भावाचाही मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, राम ढोबळे यांचा मृतदेह पुढील विधीसाठी गुरुवारी दुपारी यवतमाळ येथे नेण्यात आला. बहिणीच्या विरहाचा धक्का सहन न झाल्याने भावानेही प्राण सोडल्याची भावना व्यक्त करत गावकऱ्यांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे













