देऊळगाव राजा(बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यात खडकपूर्णा नदीपात्र व धरण क्षेत्र अवैध रेती उत्खननासाठी ‘हॉटस्पॉट’ ठरत असताना महसूल विभागाने आठवडाभरात सलग कारवाया करत तीन अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर जप्त केले आहेत. मात्र, या कारवायांमुळे तस्करीला आळा बसत असला तरी यंत्रणेतूनच माहितीची गळती होत असल्याच्या चर्चेमुळे कारवाईची परिणामकारकता प्रश्नचिन्हाखाली येत आहे.
११ फेब्रुवारी रोजी पहाटे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या पथकाने नारायणखेड परिसरात टिप्पर (क्रमांक एमएच १७, सीव्ही-०४१३) पकडला. तपासात कोणतेही वैध परवाने नसल्याचे निष्पन्न झाले. सुमारे तीन ब्रास रेतीसह लाखो रुपयांच्या किमतीचा टिप्पर अंढेरा पोलिस ठाण्यात जप्त करण्यात आला आहे. यापूर्वी ७ फेब्रुवारीला नायब तहसीलदार सायली जाधव यांच्या नेतृत्वाखाली जाफराबाद चौफुली परिसरात अवैध रेती वाहतूक करणारा
टिप्पर पकडून देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला. तसेच ३ फेब्रुवारीला दिग्रस बु, (खडकपूर्णा धरण क्षेत्र) येथे रात्रीच्या वेळी आणखी एक टिप्पर कागदपत्रांशिवाय रेती वाहतूक करताना आढळून आला. संबंधित वाहनावरही कारवाई करण्यात आली आहे. या सलग कारवायांमुळे प्रशासनाची सक्रियता दिसून येत असली तरी, काही कर्मचाऱ्यांकडून कारवाईपूर्व माहिती तस्करांपर्यंत पोहोचत असल्याच्या तक्रारी अधूनमधून पुढे येत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांना या बाबीची कल्पना असूनही ठोस अंतर्गत शिस्तभंग कारवाई होत नसल्याची चर्चा आहे.
परिणामी, एकीकडे धाडसी कारवाया आणि दुसरीकडे ‘आतील गळती’ यामुळे रेती तस्करीविरोधातील मोहिमेला सुरूच आहे















