साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज)जवळच असलेल्या मौजे हनवतखेड येथे ९२ वर्षीय क्योवृद्ध आजीला चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून एका महिलेसह अन्य दोन आरोपी फरार आहेत. ही घटना २९ जानेवारी रोजी घडली.
हनवतखेड येथील रहिवासी सुमन श्रीराम चव्हाण (वय ९२) या त्या दिवशी घरी एकट्याच होत्या. याच संधीचा फायदा घेत तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील किचन रूमचा कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला. आजी झोपेत असताना चोरट्यांनी त्यांच्या अंगावरील दागिने काढण्यास सुरुवात केली. नाकातील दागिना काढताना आजीला जाग आल्यावर चोरट्यांनी चाकू (चेन कटर) दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली.
भीतीपोटी आजीने “तुम्हाला जे पाहिजे ते घ्या, पण मला मारू नका,” अशी विनवणी केली. त्यानंतर चोरट्यांनी दोन्ही हातातील सुमारे पाच तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या, गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची पोत तसेच कानातील एक तोळ्याचे झुमके असा मुद्देमाल लुटून नेला. यावेळी घरातील ३२ इंची टीव्ही व रिसीव्हर घराबाहेर काढून ठेवण्यात आल्याचेही उघड झाले आहे.
दोघांना अटक, मुद्देमाल जप्त….
तक्रार दाखल होताच साखरखेर्डा पोलिस ठाण्याचे ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे करण एकनाथ बंजारे (रा. खेर्डा, ता. मालेगाव, जि. वाशीम) व मनोज मोहन इंगळे (रा. सुकंडा, ता. मालेगाव, जि. वाशीम) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दरम्यान, या गुन्ह्यातील एका महिलेसह अन्य दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी अनिल चव्हाण यांच्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.












