मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : गावातील दुर्गादेवीच्या भंडाऱ्यात जेवायला गेलेल्या व्यक्तीला ‘तू जेवायला का आला, तुला कोणी आमंत्रण दिले?’ असा जाब विचारत वाद घातल्याची घटना समोर आली आहे. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले असून, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी दोघांविरुद्ध २५ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार विजय गुलाब ताकतोडे यांच्या फिर्यादीनुसार, २४ ऑक्टोबर रोजी ते खेरा येथील दुर्गादेवीच्या भंडाऱ्यात जेवणासाठी गेले होते. त्यावेळी गावातील गौरव संदीप गावंडे याने त्यांना जेवायला येण्यावरून जाब विचारत वाद घातल्याचा आरोप आहे. या वादातून गौरव गावंडे याने विजय ताकतोडे यांना खाली पाडून लोखंडी रॉडने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, वाद सुरू असताना संदीप गावंडे यानेही लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. तसेच दोघांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. धार्मिक कार्यक्रमात जेवणासाठी गेलेल्या व्यक्तीला आमंत्रणावरून जाब विचारत वाद घालून मारहाण केल्याच्या या घटनेची परिसरात चर्चा सुरू आहे.
या प्रकरणी विजय गुलाब ताकतोडे यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी शिंगेपट्टू आणि पोलीस कॉन्स्टेबल सदानंद हाडे पुढील तपास करीत आहेत. या वादामागील नेमके कारण काय आणि तक्रारीतील आरोपांबाबत तपासात काय निष्पन्न होते, याकडे लक्ष लागले आहे.













