देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील भिवगाव येथे शेतीच्या वादातून एका महिलेला शिवीगाळ, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात सहाजणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौ. सुनिता रामेश्वर लोंढे (वय २८, रा. भिवगाव, ता. देऊळगाव राजा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी बाळासाहेब कीसन लोंढे, केशव कीसन लोंढे, वैभव बाळासाहेब लोंढे, भागवत बाळासाहेब लोंढे, कीसन भानुदास लोंढे व जमुनाबाई बाळासाहेब लोंढे, सर्व रा. भिवगाव, ता. देऊळगाव राजा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१३ मे २०२६ रोजी दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास भिवगाव शिवारात ही घटना घडली. फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक असून त्यांच्यामध्ये शेतीचा वाद सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, आरोपी क्रमांक १ व २ हे फिर्यादीच्या शेतातील डीपीजवळ काही काम करत असताना फिर्यादींनी त्यांना हटकले. याचा राग आल्याने आरोपींनी शिवीगाळ केली. तसेच खाली पडलेला फ्यूज फेकून मारल्याने तो फिर्यादीच्या हाताच्या करंगळीला लागल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
यानंतर आरोपी फिर्यादीच्या घराजवळ जमा झाले व “तुम्ही कुठे जाता?” असे म्हणत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या तक्रारीवरून व वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायम अपराध क्रमांक २१०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत कलम १८९(२), १२५(अ), ३५१(२), ३५१(३) व ३५२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर प्रकरणाची नोंद पोहेका संजय गोरे यांनी केली असून पुढील तपास ते करीत आहेत.












