देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील निमखेड येथे एका ४२ वर्षीय युवा शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना १२ मे रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. शंकर मृत ओवितराव कडुळे निमखेड असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शंकर कडुळे यांनी राहत्या घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने त्यांना उपचारासाठी देऊळगाव राजा येथील शिंदे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच देऊळगाव राजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
मृत शेतकरी यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे निमखेड परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पुढील तपास देऊळगाव राजा पोलीस करीत आहेत.














