Advertisement Advertisement

आई-बाप गावाला गेले अन् तरुणानं डाव साधला! आजीच्या घरातून १६ वर्षांच्या पोरीला पळवलं; उमऱ्यात अत्याचाराचा आरोप, बुलढाण्यात खळबळ….

धाड (बुलडाणा कव्हरेज न्युज) : आजीच्या घरी राहण्यासाठी आलेल्या अवघ्या १६ वर्षे २ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्याच गावातील एका तरुणाविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

धाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या या अल्पवयीन मुलीला तिच्या आई-वडिलांनी १९ नोव्हेंबर २०२६ रोजी बुलढाणा शहरातील आजीच्या घरी राहण्यासाठी आणून सोडले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी तिचे आई-वडील पुन्हा आपल्या गावी परतले. ही बाब समजल्यानंतर पीडित मुलीच्याच गावातील एका तरुणाने संधी साधत सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास आजीच्या घराजवळून तिला आपल्या दुचाकीवर बसवून फूस लावून नेले. त्यानंतर खामगाव तालुक्यातील उमरा येथील आपल्या आत्याच्या घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या घटनेनंतर २२ नोव्हेंबर रोजी पीडित मुलीने बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणेदार संग्राम पाटील यांनी तातडीने कारवाई करीत संबंधित तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४, १३७ (२) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ४ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवी मोरे करीत आहेत.

अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!

या घटनेने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालकांनी अधिक जागरूक राहणे, मुलांशी मोकळेपणाने संवाद साधणे आणि त्यांच्या अडचणी समजून घेणे गरजेचे आहे. तसेच अल्पवयीन मुलींना फूस लावून नेणे आणि त्यांच्यावरील लैंगिक अत्याचार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांविषयी समाजात जागरूकता निर्माण होणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!