Advertisement Advertisement

शेतकऱ्यांना पीककर्ज देत नाही, वरून पाच हजारांची मदत! माजी आ.राहुल बोंद्रे अमडापूरच्या एसबीआय बँकेत धडकले; व्यवस्थापकाला धरले धारेवर!

अमडापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : एकीकडे दुष्काळाचं सावट, दुसरीकडे डोक्यावर कर्जाचा डोंगर अन् त्यात बँकेकडून पीककर्जासाठी अडवणूक! अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा संताप आता वाढू लागला आहे. अमडापूर येथील भारतीय स्टेट बँकेकडून इतर बँकांमध्ये मॉर्गेज असलेल्या तसेच सातबारा उताऱ्यावर कर्जाचा बोजा असलेल्या शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यात अडचणी येत असल्याने परिसरातील शेतकरी चिंतेत होते. अखेर शेतकऱ्यांनी माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी बोंद्रे यांनी थेट शेतकऱ्यांना सोबत घेत अमडापूरच्या एसबीआय शाखेत धडक दिली आणि बँक व्यवस्थापकाला धारेवर धरले.

शेतकरी आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. पिकांचे नुकसान, डोक्यावर कर्जाचा वाढता बोजा आणि शेतीचा खर्च भागविण्यासाठी पैशांची चणचण अशा परिस्थितीत पीककर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत. त्यातच शासनाकडून जाहीर करण्यात आलेली पाच हजार रुपयांची आगाऊ मदत अपुरी असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत बँकांनीही सहकार्य केले नाही, तर शेतकऱ्यांनी शेतीचा खर्च भागवायचा कसा, असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, बँक व्यवस्थापकाकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत अपेक्षित सहकार्य होत नसल्याचे पाहून राहुल बोंद्रे संतप्त झाले. त्यांनी थेट भ्रमणध्वनीवरून जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या. शेतकरी अगोदरच दुष्काळाच्या छायेत असून, कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. अशा वेळी त्याला दिलासा देण्याऐवजी बँकांकडून त्रास होत असेल, तर हे सहन केले जाणार नाही. शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने दूर करून त्यांना पीककर्ज मिळण्याबाबत योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच शेतकऱ्यांना होणारा त्रास थांबवून त्यांना तातडीने मदत न केल्यास शेतकऱ्यांच्या हितासाठी जनआंदोलन उभारण्याचा इशाराही बोंद्रे यांनी दिला.

या वेळी बँक व्यवस्थापकांनी शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. या धडक भेटीदरम्यान काँग्रेस तालुकाध्यक्ष रामभाऊ जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे समाधान सुपेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य श्याम पठाडे, तालुकाध्यक्ष पवार, गजानन वायाळ, अमडापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच अजिज, ग्रामपंचायत सदस्य मसुद भाई, माजी सरपंच कमर अब्जल, चिखली अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष गाजी बाबा खान, जगदंबा पतसंस्थेचे संचालक विजय राऊत, बाबुराव सोनुने यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!