Advertisement Advertisement

CRIME STORY:तीन एकरांसाठी सख्ख्या भावाचं रक्त सांडलं, जन्मदाती आईलाही सोडलं नाही! बापानं दोघांना संपवलं, पोरानं चुलत भावाचा जीव घेतला; सोमठाण्यात रक्ताच्या नात्यांचाच खेळ खल्लास!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अवघ्या तीन एकर शेतीच्या वादातून रक्ताच्या नात्यालाच काळिमा फासणारी घटना चिखली तालुक्यातील सोमठाणा गावात घडली. सख्ख्या भावासोबत असलेला जमिनीचा वाद, आईने आपल्या वाट्याची तीन एकर शेती मोठ्या मुलाच्या मुलाच्या नावावर केल्याचा राग आणि शेतातील मोटारपंपाच्या वायरवरून झालेला वाद… या सगळ्याचा शेवट तीन निष्पाप जीवांच्या हत्येत झाला. गुरुवार, ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास दीपक सुरडकर याने मोठा भाऊ संजय सुरडकर आणि ७० वर्षीय आई सरस्वती यांची हत्या केली, तर दीपकचा मुलगा जगदीश याने चुलत भाऊ रणजीत याच्यावर चाकूने वार करून त्याचा जीव घेतला. घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी युद्धपातळीवर तपास करत बाप-लेकाला ताब्यात घेतले. अवघ्या तीन एकर जमिनीसाठी एकाच कुटुंबातील तीन जणांचा बळी गेल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

मोटारपंपाच्या वायरवरून वाद; बाप-लेक थेट दीपकच्या घरासमोर!

८ ऑक्टोबर रोजी शेतातील मोटारपंपाची केबल दीपकने तोडल्याचा संशय संजय यांना होता. याच कारणावरून दोघा भावांमध्ये शेतात वाद झाला. काही गावकऱ्यांनी मध्यस्थी करून त्यावेळी वाद मिटवला. मात्र, संजय शेतातून दुचाकीने घरी निघाले असता दुचाकीची वायरही तोडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे ते दुचाकी ढकलत गावात पोहोचले. त्यांनी फोन करून मुलगा रणजीत याला घडलेला प्रकार सांगितला.

दरम्यान, रणजीत हा मित्रासोबत अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी येथे दर्शनासाठी गेला होता. वडिलांचा फोन आल्यानंतर तो मित्रासह सोमठाण्यात परतला. गावात येताच वडील दुचाकी ढकलत थकलेल्या अवस्थेत येताना दिसल्याने त्याने गाडी थांबवून विचारपूस केली. मोटारपंपाची केबल आणि दुचाकीची वायर तोडल्याचे वडिलांकडून समजताच संजय आणि रणजीत हे दीपकच्या घराजवळ गेले. ‘मोटारची केबल का तोडली?’ अशी विचारणा करताच दोन्ही बाजूंमध्ये पुन्हा शाब्दिक वाद सुरू झाला.

क्षणार्धात वादाचे रूपांतर तिहेरी हत्याकांडात!

वाद सुरू असतानाच संतापलेल्या जगदीशने घरात जाऊन धारदार चाकू आणला आणि रणजीतवर हल्ला केला. त्याचवेळी दीपकनेही चाकूने मोठा भाऊ संजय याच्यावर वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. चाकूच्या वारांमुळे संजय आणि रणजीत हे बाप-लेक रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला.

यानंतर दीपक रक्ताने माखलेला चाकू घेऊन काही अंतरावर असलेल्या आई सरस्वती यांच्या घरी गेला. पलंगावर असलेल्या ७० वर्षीय आईवरही त्याने चाकूने वार केले. त्यात सरस्वती यांचाही मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तीन जणांचा काही मिनिटांत बळी गेल्याने सोमठाणा गाव सुन्न झाले. घटनेची माहिती पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. रक्ताच्या नात्यातील या भीषण संघर्षाने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

‘आता कोणालाच सोडणार नाही!’ म्हणत पुतणीच्या गावाकडे धाव…

आई आणि भावाची हत्या केल्यानंतर दीपक शांत बसला नाही. मृत संजय यांच्या मुलीच्या दिवठाणा येथील घरी जाण्यासाठी तो चाकू घेऊन मोटारसायकलवरून निघाल्याची माहिती समोर आली. मात्र, तेथे त्याला पुतणी दिसली नाही. त्यानंतर उदयनगर येथे चाकू टाकून तो ट्रॅव्हल्सने मुंबईच्या दिशेने रवाना झाला. दरम्यान, नातेवाइकांनी त्याला फोन करून पोलिसांसमोर शरण जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दीपक हा पनवेल पोलिसांकडे गेला आणि त्याने घडलेला प्रकार सांगितला.

चिखली पोलिसांची तत्परता; पनवेलमधून आरोपीला ताब्यात घेतले…

घटनेची माहिती मिळताच चिखलीचे ठाणेदार भूषण गावंडे यांनी वरिष्ठांना माहिती देऊन सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी संजय आणि रणजीत यांचे मृतदेह जमिनीवर, तर वृद्ध सरस्वती यांचा मृतदेह घरातील पलंगावर आढळून आला. आरोपी दीपक हा पुतणीच्या गावाकडे गेल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सोमठाणा आणि शेलुद येथे बंदोबस्त तैनात केला.

जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सोहम माछरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून आवश्यक नमुने गोळा केले. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखली उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

दरम्यान, आरोपींच्या शोधासाठी चिखली पोलिसांचे गुन्हे प्रगटीकरण पथक आणि इतर पथके कामाला लागली. दीपकचा मुलगा जगदीश याला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद गिरी यांच्या पथकाने त्याच रात्री ताब्यात घेतले. दीपक मुंबईच्या दिशेने पळाल्याची माहिती मिळाल्यानंतर चिखली पोलिसांच्या पथकाने पनवेल गाठून त्याला ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

तीन एकर शेतीचा वाद नेमका कसा पेटला?

सोमठाणा येथील सरस्वती सुरडकर यांना संजय, दीपक आणि अजय अशी तीन मुले होती. तिन्ही मुले विवाहित असून, मोठा मुलगा संजय हा सुमारे दहा वर्षांपूर्वी सोमठाणा येथून जवळच असलेल्या शेलुद येथे स्थायिक झाला होता. संजय यांच्या कुटुंबात पत्नी, एक मुलगा आणि एक विवाहित मुलगी आहे. तर दीपकच्या कुटुंबात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी आहे.

तिन्ही भावांना प्रत्येकी दोन एकर शेतीची वाटणी करण्यात आली होती. याशिवाय आई सरस्वती यांच्या नावावर तीन एकर शेती होती. तिन्ही भावांची शेती जवळजवळ असल्याने छोट्या-छोट्या कारणांवरून त्यांच्यात वाद होत असत. दीपकची आईसोबतची वागणूक चांगली नसल्याने संजय त्याच्याशी फारसे बोलत नव्हते. कालांतराने दोन्ही भावांमधील संवादही बंद झाला होता.

याचदरम्यान, सरस्वती यांनी त्यांच्या वाट्याची तीन एकर शेती बक्षीसपत्राद्वारे संजय यांच्या मुलाच्या नावावर केली. आईने स्वतःच्या जमिनीचा हक्क मोठ्या भावाच्या मुलाला दिल्याचा राग दीपकच्या मनात होता. याच कारणावरून तो वारंवार संजयसोबत वाद घालत असल्याचे समोर आले आहे. शेतीच्या वाटणीवरून सुरू झालेला हा वाद अखेर रक्तरंजित संघर्षात बदलला.

नात्यांचा अंत; गावावर शोककळा…

एकाच कुटुंबातील तीन जणांच्या मृत्यूमुळे सोमठाणा आणि शेलुद परिसरावर शोककळा पसरली. चिखली उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर पोलीस बंदोबस्तात तिन्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. शेतीच्या वादातून सख्ख्या भावाचा, वृद्ध आईचा आणि पुतण्याचा जीव गेल्याने नागरिकांमधून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सोहम माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे, चिखलीचे ठाणेदार भूषण गावंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक शरद भागवतकर, अश्विनी गाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद गिरी, अमोल गवई, विजय किटे, अजय इटावा, सुनील राजपूत, उमेश राजपूत, प्रशांत धंदर आणि राहुल पायघण यांनी केला.

जमिनीचा तुकडा उरतो; पण नाती कायमची तुटतात!

शेती, मालमत्ता आणि वारसाहक्कावरून कुटुंबांमध्ये मतभेद होणे नवीन नाही. मात्र, या वादातून माणुसकीच हरवली तर त्याची किंमत संपूर्ण कुटुंबाला मोजावी लागते. जमिनीच्या वाटणीवरून वाद झाल्यास ज्येष्ठ व्यक्ती, विश्वासार्ह मध्यस्थ किंवा कायदेशीर सल्ल्याच्या माध्यमातून तो सोडवता येऊ शकतो. रागाच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. शेतीचा तुकडा पुन्हा मिळवता येईल, मालमत्तेचे नुकसान भरून काढता येईल; पण गेलेला जीव कधीच परत येणार नाही. त्यामुळे जमिनीपेक्षा नात्यांना, अहंकारापेक्षा संवादाला आणि सूडापेक्षा कायद्याला महत्त्व देणे गरजेचे आहे. कारण मालमत्तेचा वाद संपवण्यासाठी कायदेशीर मार्ग असतो; मात्र रक्ताच्या नात्यांचा अंत झाल्यानंतर उरते ती केवळ आयुष्यभराची वेदना!

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!