शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि गांधी चौक या दोन वेगवेगळ्या ठिकाणी १५ ऑक्टोबर रोजी दोन अनोळखी पुरुषांचे मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दोन्ही व्यक्तींच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पहिली घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात घडली. येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकाजवळ गुरुवारी दुपारी अंदाजे ५५ वर्षांच्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. याबाबत सुमीत नंदू बांगर (वय ३२, व्यवसाय मजुरी, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शेगाव) यांनी पोलिसांना माहिती दिली. दुपारी २.३० वाजण्यापूर्वी ही घटना उघडकीस आल्याची नोंद आहे.
दुसरी घटना शहरातील गांधी चौक परिसरात घडली. येथील भरका देवी आईस्क्रीम दुकानासमोर गुरुवारी दुपारी सुमारे २ वाजता अंदाजे ५२ वर्षांच्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. दुकानचालक रतनलाला देविलाल जाट (वय ४५, मूळ रा. चित्तोडगड, राजस्थान, सध्या शेगाव) यांनी याबाबत शेगाव शहर पोलिसांना तोंडी माहिती दिली.
शहरातील दोन वेगवेगळ्या चौकांत एकाच दिवशी दोन अनोळखी पुरुषांचे मृतदेह आढळल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. दोन्ही व्यक्तींची ओळख आणि त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दोन्ही प्रकरणांत शेगाव शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.













