Advertisement Advertisement

शेतात कपाशीला पाणी देत होती महिला, नराधमांनी डाव साधला! झोटिंगा शिवारातील घटनेनं परिसर हादरला!

दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतात कपाशीच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील बीबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या झोटिंगा शिवारात १२ ऑक्टोबर रोजी ही घटना घडल्याची फिर्याद पोलिसांकडे दाखल झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गौतम पंडित खरात (वय २२) आणि मोहन केशव बनसोड (वय ३१, दोघेही रा. निमगाव वायाळ) यांना ताब्यात घेतले असून, न्यायालयाने दोघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांकडे दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, संबंधित महिला झोटिंगा शिवारातील शेतात कपाशीच्या पिकाला पाणी देण्यासाठी पाईप लावत होती. यावेळी आरोपींनी तिच्याजवळ येऊन बळजबरी केल्याचा आरोप आहे. एका आरोपीने महिलेचे तोंड दाबून तिला खाली पाडले, त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद असल्याची माहिती आहे. तसेच, या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास चाकूने जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणातील संशयित मोहन केशव बनसोड याला १६ ऑक्टोबर रोजी बीबी पोलिसांनी ताब्यात घेतले, तर गौतम पंडित खरात याला १७ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निमगाव वायाळ येथून ताब्यात घेतल्याची माहिती आहे. फिर्यादीत दीपक गवळी (रा. संभाजीनगर) याचेही नाव नमूद असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेच्या वेळी मोहन बनसोड याने लक्ष ठेवले असल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास बीबी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन सोनटक्के आणि पोलीस कॉन्स्टेबल अरुण सानप करीत आहेत. तपासातून या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार असून, पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!