डोणगाव(बुलडाणा कव्हरेज न्युज):तालुक्यातील लोणी गवळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी शिक्षकाला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी (एमसीआर) सुनावली आहे. अटकेत असताना आरोपीचा रक्तदाब (बीपी) वाढल्याने पोलिसांना रात्रभर जागून काढावी लागल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महादेव आत्माराम मानतोडे हा शिक्षक मागील पाच वर्षांपासून संबंधित शाळेत कार्यरत होता. त्याच्यावर विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचे आरोप असून दोन दिवसांपूर्वी त्याने तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची गंभीर घटना उघडकीस आली. तसेच ही बाब कुणाला सांगितल्यास जीवाने मारण्याची धमकीही दिल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून डोणगाव पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. ९ एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
दरम्यान, अटकेत असताना आरोपीचा बीपी वाढल्याने त्याची प्रकृती बिघडली. त्यामुळे पोलिसांना रात्रभर त्याच्यावर लक्ष ठेवावे लागले, अशी चर्चा पोलीस वर्तुळात आहे.
या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून मेहकर तालुक्यातील शिक्षण विभागाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मागील दोन वर्षांत मद्यपी शिक्षक व इतर शिस्तभंगाच्या प्रकरणांमुळे शिक्षण विभागाची प्रतिमा मलिन झाली असून संबंधित विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांच्या कार्यप्रणालीवरही नाराजी व्यक्त केली जात आहे. काही प्रकरणे अजूनही चौकशीअंतर्गत असल्याने त्यावर काय कारवाई होणार, याकडे लक्ष लागले आहे.













