किनगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): रेतीची वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परच्या धडकेत एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ३ जून रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास शेलगाव राऊत फाट्याजवळ घडली.
काशीराम राठोड (वय ८५, रा. पांग्री उगले) असे मृत वृद्धाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काशीराम राठोड हे शेलगाव राऊत फाट्याजवळ महामार्ग ओलांडत असताना रेती घेऊन जाणाऱ्या भरधाव टिप्परने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, ते हवेत उडून खाली कोसळले व गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीस धाव घेत त्यांना उपचारासाठी जालना येथे हलविले. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
विशेष म्हणजे, अपघातास कारणीभूत ठरलेले रेती वाहतूक करणारे टिप्पर विनानंबरचे असल्याचे समोर आले आहे. अपघातानंतर चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला. वृत्त लिहिपर्यंत या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झालेली नव्हती.
दरम्यान, हिवरखेड पूर्णा, राहेरी तसेच परिसरातील इतर भागांतून रेतीची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची चर्चा आहे. याबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. रेती तस्करीशी संबंधित वाहनांमुळे यापूर्वीही अनेक गंभीर अपघात घडले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याचे नागरिकांनी सांगितले.













