वर्दडी बुद्रुक (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सनई-चौघड्यांचे मंजुळ सूर, मंगलाष्टकांचा गजर, डीजेचा दणदणाट आणि वऱ्हाडी-पाहुण्यांच्या आनंदी उपस्थितीत सुरू असलेला विवाहसोहळा क्षणात शोकमय बनल्याची हृदयद्रावक घटना वर्दडी बुद्रुक येथे घडली. मुलीचे कन्यादान करत असतानाच वधूपित्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे लग्नघरातील आनंदाचे वातावरण क्षणात दुःखात परिवर्तित झाले.
कुरूमदास कुंडलीक भुतेकर (वय ५०) असे मृत वधूपित्याचे नाव आहे. त्यांची कन्या नंदिनी हिचा विवाह जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील आर्डी (तोलाजी) येथील प्रदीप महादेव नानोटे यांच्याशी निश्चित झाला होता. लेकीचा संसार सुखाचा व्हावा आणि विवाहसोहळा संस्मरणीय व्हावा यासाठी भुतेकर यांनी अनेक दिवसांपासून लग्नाच्या तयारीसाठी मोठी धावपळ केली होती. नातेवाईक, मित्रपरिवार आणि गावकऱ्यांना त्यांनी स्वतः जाऊन आग्रहाचे निमंत्रण दिले होते.
१२ मे रोजी दुपारपर्यंत लग्नघरात उत्साहाचे वातावरण होते. दोन्ही बाजूंच्या वऱ्हाडी मंडळी आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाहसोहळा आनंदात पार पडला. मुख्य विवाहविधी पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वधूची पाठवणीपूर्वीचा भावनिक आणि महत्त्वाचा कन्यादान विधी सुरू होता. यावेळी कुरूमदास भुतेकर हे धार्मिक विधीनुसार कन्या नंदिनी हिचे कन्यादान करत असतानाच अचानक त्यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या आणि ते जागीच कोसळले.
घटनेनंतर लग्नमंडपात एकच खळबळ उडाली. उपस्थित नातेवाईक आणि ग्रामस्थांनी तातडीने त्यांना सिंदखेडराजा येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या अनपेक्षित घटनेने भुतेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
१३ मे रोजी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, दोन भाऊ, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
दरम्यान, नव्या संसारात पाऊल ठेवण्यापूर्वीच पित्याचे छत्र हरपल्याने नववधू नंदिनी हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुपारी मुलीच्या डोक्यावर अक्षता टाकून आशीर्वाद देणाऱ्या पित्याचेच सायंकाळी पार्थिव पाहण्याची वेळ कुटुंबावर आल्याने गावासह उपस्थित वऱ्हाडी मंडळींनाही अश्रू अनावर झाले.
विशेष म्हणजे, कुरूमदास भुतेकर यांना डिसेंबर २०२५ मध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तसेच २६ डिसेंबर रोजी त्यांच्या आईचे निधन झाले होते. मुलगा विशाल याचा विवाह २१ एप्रिल रोजी पार पडला होता. त्यानंतर अवघ्या एकवीस दिवसांत मुलगी नंदिनीचा विवाह करण्याचे त्यांनी ठरवले होते. मुलीच्या डोक्यावर अक्षता टाकून आशीर्वाद दिल्यानंतरच नियतीने त्यांना काळाच्या पडद्याआड नेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.












