डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):मेहकर तालुक्यातील राजगड येथे सर्पदंशामुळे सहा वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ३ जुलैच्या मध्यरात्री घडली. राज अभिषेक राठोड (वय ६) असे मृत बालकाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज याने २ जुलै रोजी डोणगाव येथील जीवन विकास कॉन्व्हेंटमध्ये इयत्ता पहिलीत प्रवेश घेतला होता. शाळेच्या पहिल्या दिवशीचा आनंद घेऊन तो घरी परतला होता. नवीन शाळा, मित्र आणि शिक्षकांविषयीच्या गप्पा कुटुंबीयांसोबत मारल्यानंतर तो रात्री झोपी गेला.
दरम्यान, रात्री वीज गेल्याने उकाड्यामुळे घराचा दरवाजा उघडा ठेवण्यात आला होता. रात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास राज रडू लागला. त्याच्या पायाला काहीतरी चावल्याचे दिसल्याने सुरुवातीला उंदीर किंवा अन्य एखाद्या प्राण्याने चावा घेतला असावा, असा कुटुंबीयांचा समज झाला. मात्र, काही वेळातच त्याच्या पायाला सूज येऊन तो निळसर पडू लागला आणि असह्य वेदना सुरू झाल्या.
स्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला तातडीने उपचारासाठी डोणगावकडे रवाना केले. मात्र, दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर घराची पाहणी केली असता, चावा घेतलेला साप घरातील पलंगाजवळ ठेवलेल्या एका खोक्यात लपलेला आढळून आला. गावकऱ्यांनी तो साप पाहिल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
अवघ्या एक दिवसापूर्वी शाळेच्या नव्या प्रवासाला सुरुवात केलेल्या राजचा असा दुर्दैवी अंत झाल्याने राजगड गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावातून कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.














