Advertisement Advertisement

चोरती बाई पोलिसांनी पकडली! ती पर्स मधील डोरले, जोडवे या सह बाजारात दागिने चोरत होती….

चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): महिलांवर पाळत ठेवून त्यांच्या पर्समधील मौल्यवान दागिने लंपास करणाऱ्या एका सराईत महिला चोरट्यास चिखली पोलिसांच्या डी.बी. पथकाने छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली आहे. तिच्याकडून चोरीस गेलेले सुमारे ३१ हजार ९५० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ११ मे २०२६ रोजी फिर्यादी महिला आपल्या वडिलांसह चिखली येथे जुने दागिने मोडून नवीन दागिने तयार करण्यासाठी आल्या होत्या. नव्याने बनविण्यात आलेले तीन चांदीचे जोडवे (वजन ५१.४१ ग्रॅम), दोन सोन्याचे डोरले व चार सोन्याचे मणी असा एकूण ३१ हजार ९५० रुपयांचा ऐवज त्यांनी कापडी पिशवीत ठेवून ती वायरच्या पिशवीत ठेवली होती.

यानंतर त्या शहरातील मनीषा स्टील होम या दुकानात खरेदी करत असताना त्यांच्या मागे उभी असलेल्या एका अनोळखी महिलेने संधी साधून पिशवीतील दागिने चोरून नेले. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३९८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक अमोल गवई यांच्याकडे सोपविण्यात आला होता. पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान गुप्त माहितीच्या आधारे संबंधित महिला जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चंदनापुरी परिसरात वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी जालना व छत्रपती संभाजीनगर येथे शोधमोहीम राबविली.

दरम्यान, आरोपी महिला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालय परिसरात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. संशयास्पद हालचाली करत असताना तिला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान तिने आपले नाव सुवर्णा काकासाहेब काळे (वय ४०), रा. पाथर्डी रोड, शेवगाव, जि. अहमदनगर, ह.मु. चंदनापुरी, ता. अंबड, जि. जालना असे सांगितले.

सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर तिने चोरीची कबुली दिली. पुढील तपासासाठी तिला चिखली येथे आणण्यात आले. महिला पोलिस व पंचांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या अंगझडतीमध्ये चोरीस गेलेले दोन सोन्याचे डोरले, चार सोन्याचे मणी आणि तीन चांदीचे जोडवे असा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.

या कारवाईमुळे महिलांना लक्ष्य करणाऱ्या सराईत चोरट्यांचा पर्दाफाश झाला असून चिखली पोलिसांच्या डी.बी. पथकाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!