मोताळा (बुलढाणा कव्हरेज न्यूज) : तालुक्यातील बोराखेडी पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात ३० वर्षीय महिलेचा घरात घुसून विनयभंग केल्याची घटना १५ मे रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला रात्री आपल्या घरी झोपलेली असताना घराचे दार उघडे असल्याचा फायदा घेत आरोपी गजानन जयराम हरमकार याने घरात प्रवेश केला. त्यानंतर आरोपीने महिलेचा उजवा हात पकडून तिचा विनयभंग केला.
यावेळी महिलेने आरडाओरड केल्याने आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. जाताना त्याने पीडितेला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पीडित महिलेच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी आरोपी गजानन जयराम हरमकार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४, ३३३ सह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.












