खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील कोलोरी शिवारातील एका ढाब्याजवळ भरधाव आयशर वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत अंदाजे ५० ते ५५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २४ जून २०२६ रोजी रात्री ११ वाजण्यापूर्वी ही घटना घडली. आयशर क्रमांक एमएच-१२-आरएन-८३१४ चा चालक शहानुर मोहम्मद सय्यद (रा. लोणीकाळभोर, जि. पुणे) याने वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून रस्ता ओलांडत असलेल्या अथवा रस्त्यालगत असलेल्या अंदाजे ५० ते ५५ वर्षीय अज्ञात महिलेला धडक दिली. या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी चालक शहानुर मोहम्मद सय्यद याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०६(१), २८१ तसेच मोटार वाहन कायद्यान्वये कलम १३४/१७७ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. मृत महिलेची ओळख पटविण्याचे प्रयत्नही पोलिसांकडून करण्यात येत आहेत.













